मध्य रेल्वेकडून मनमाड भुसावळ मार्गावर तिसर्‍या नव्या मार्गिकेच्या कामासाठी 14-15 ऑगस्ट दरम्यान ब्लॉक; 40 मेल एक्सप्रेस रद्द

मनमाड भुसावळ मार्गावरील हा ब्लॉक सोमवार (14 ऑगस्ट) सकाळी 11 ते मंगळवार (15 ऑगस्ट) दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे.

Vande Bharat Train | Twitter

शनिवार, रविवारची सुट्टी आणि त्याला जोडून मंगळवारी आलेली 15 ऑगस्टची सुट्टी यामुळे अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन आखला आहे. परंतू मनमाड भुसावळ (Bhusawal-Manmad) मार्गावर तिसर्‍या नव्या मार्गिकेचं काम हाती घेतलं जाणार असल्याने 14-15 ऑगस्ट दरम्यान 15 तासांचा विशेष मेगाब्लॉक (Mega Block) जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान मुंबई-शिर्डी वंदे भारत सह अन्य 40 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.

काही रेल्वे पर्यायी मार्गांवर धावतील तर काही अंशत: रद्द करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आज (13 ऑगस्ट) सीएसएमटी-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-आदिलाबाद एक्स्प्रेस आणि हजूर साहिब नांदेड-मुंबई एक्स्प्रेस या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे. १४ ऑगस्टला म्हणजेच उद्या सीएसएमटी-साईनगर-सीएसएमटी शिर्डी वंदे भारत ट्रेन, देवळाली-भुसावळ मेल, सीएसएमटी-नांदेड, सीएसएमटी-जालना जनशताब्दी ट्रेन, मुंबई-नागपूर सेवाग्राम मेल, मुंबई-आदिलाबाद एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस आणि मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस या रेल्वे रद्द करण्यात येणार आहे. तर १५ ऑगस्टला देवळाली-भुसावळ मेल, सीएसएमटी- नांदेड एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड मेल, देवगिरी एक्स्प्रेस आणि एलटीटी-हजूर साहिब नांदेड मेल या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. दादर-साईनगर ही वंदे भारत एक्स्प्रेस शिर्डी-पुणे-दौंडमार्गे चालवली जाणार आहे.

मनमाड भुसावळ मार्गावरील हा ब्लॉक सोमवार (14 ऑगस्ट) सकाळी 11 ते मंगळवार (15 ऑगस्ट) दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे. मध्य रेल्वे कडून या वेळेत भुसावळ-मनमाड विभागादरम्यान नवीन तिसरी मार्गिका टाकली जाणार आहे. पाचोरा ते मनमाड विभागादरम्यान 112.22 किलोमीटर नवीन तिसऱ्या मार्गिकेचे बांधकाम पसध्या सुरू आहे. यासाठी मनमाड यार्डमध्ये इंटर लॉकिंग कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.