पुणे: नितीन गडकरी यांच्या एका वाहनाचे बनावट 'PUC'; संबंधित पीयूसी केंद्र चालकावर गुन्हा दाखल

सांगोलकर यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन पोलिसांनी जंगली महाराज रस्त्यावरील संगमेश्वर पीयूसी सेंटर (PUC Centre) चालकावर गुन्हा दाखल केला.

Nitin Gadkari | (Photo credit : Facebook)

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या वाहनाबाबत पुण्यातील एका पीयूसी केंद्राने चक्क भामटेगीरी केल्याचे उघडकीस आले आहे. या केंद्र चालकाने गडकरी यांच्या एका वाहनाचे चक्क बनावट 'पीयूसी' (वाहन प्रदूषण चाचणी प्रमाणपत्र) दिले. प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील दोन पीयूसी केंद्रांनी आणि नागपूर, चंद्रपूर येथील केंद्रावर ही बनावट पीयूसी (PUC) काढली होती. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगोलकर यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन पोलिसांनी जंगली महाराज रस्त्यावरील संगमेश्वर पीयूसी सेंटर (PUC Centre) चालकावर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, संबंधित पीयुसी चालकाचा परवाणा तातडीने रद्द करण्यात आला असून, त्याच्यावर कारवाईची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. डेक्कन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचेही हे अधिकारी म्हणाले. कोणत्याही वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र घ्यायचे असल्यास ते वाहन पीयूसी केंद्रावर घेऊन जावे लागते. तसेच, पीयूसी केंद्रावर असलेल्या गॅस अॅनालायझर मशिनद्वारे वाहनाची तपासणी करणे आवश्यक असते. (हेही वाचा, भाजपा कार्यकारिणी बैठकीस नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे अनुपस्थित; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधान)

प्राप्त माहितीनुसार, पुणे शहरातील जंगली महाराज रस्त्यावर संगमेश्वर पीयूसी सेंटर आहे. या सेंटरमध्ये एका अनोळखी वाहन चालकाने 'एमएच-४९, एई-२७००' हा वाहन नोंदणी क्रमांक सांगून दोन 'पीयूसी' प्रमाणपत्रं घेतली. त्यापैकी अनुक्रमे पहिले प्रमाणपत्र हे १४ सप्टेंबर ते १३ मार्च २०२० आणि दुसरे प्रमाणपत्र १३ मार्च २०२० ते १२ सप्टेंबर २०२० या कालावधीचे आहे.