President's Rule in Maharashtra: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का? निवडणूक निकालानंतर 72 तासांत सत्ता स्थापन न झाल्यास काय होणार? वाचा सविस्तर

सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे राज्यातील पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी केवळ 72 तासांचा कालावधी मिळणार आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी या एका गटाला स्पष्ट बहुमत मिळाले तरी मुख्यमंत्रिपदावरून एकमत होणे आवश्यक आहे.

President's Rule in Maharashtra (फोटो सौजन्य - File Image)

President's Rule in Maharashtra: उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election 2024 Results) जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 72 तासांनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (President's Rule) लागू होऊ शकते. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे राज्यातील पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी केवळ 72 तासांचा कालावधी मिळणार आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी या एका गटाला स्पष्ट बहुमत मिळाले तरी मुख्यमंत्रिपदावरून एकमत होणे आवश्यक आहे.

विधानससभा निवडणूक निकालानंतर पुढील 72 तास महत्त्वाचे -

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर 72 तासांत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. 2019 आणि 2014 च्या निवडणुकीनंतर राज्यात काही काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाने किंवा आघाडीने सरकार स्थापनेचा दावा केला नाही, तर राज्याला पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागू शकते. विरोधी आघाडीसाठी हा चिंतेचा विषय ठरू शकतो. त्यामुळे निकालापूर्वीच आमदार फूटू नये, यासाठी पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत. (हेही वाचा - Maharashtra Election Results 2024: मतमोजणीच्या दिवशी मुंबई पोलिसांनी जारी केले निर्बंध; केंद्राच्या 300 मीटर परिघात लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी)

अपक्ष आमदारांची भूमिका महत्त्वाची -

महाराष्ट्रातील निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अशा स्थितीत राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास अपक्ष आमदारांची बार्गेनिंगची शक्यता वाढणार आहे. (हेही वाचा: Cash For Votes Allegations: पैसे वाटपाच्या आरोपांनंतर विनोद तावडेंची कायदेशीर कारवाई; मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींसह 'या' काँग्रेस नेत्यांना पाठवली नोटीस)

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता -

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत प्रामुख्याने प्रत्येकी तीन पक्षांचा समावेश आहे. निवडणुकीत विजयी होणाऱ्या महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून खडाजंगी झाली तर सरकार स्थापनेला विलंब होऊ शकतो. तसेच महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यात सरकार स्थापनेसंदर्भात खरा अडथळा म्हणजे मुख्यमंत्रिपदाबाबत एकमत. कोणत्याही आघाडीला बहुमत मिळण्यापेक्षा मुख्यमंत्रिपदावर एकमत घडवणे महत्त्वाचे आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार -

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उद्धव ठाकरे हे प्रबळ दावेदार आहेत. दरम्यान, महायुतीचे मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार एकनाथ शिंदे यांची आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तगडी स्पर्धा आहे. राज्यात भाजपने जास्त जागांवर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे महायुतीत भाजपला जास्त जागा मिळाल्यास भाजप विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. परिणाम, मुख्यमंत्री म्हणून भाजप आपल्या पक्षातील उमेदवार देण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती राजवट कधी लागू होते ? (When is President's Rule imposed)

कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट तेव्हाच लागू केली जाते जेव्हा कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नसतो. किंवा सरकार स्थापन होण्यापूर्वी विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. सध्याची परिस्थिती पाहता, महायुती किंवा महाविकास आघाडी 72 तासांत सरकार स्थापन करू शकली नाही, तर राज्यपालांच्या शिफारशींच्या आधारे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.