Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, भरधाव खासगी बस ट्रकला धडकली

छत्रपतीसंभाजीनगर शहराजवळील सावंगी परिसरात ही भीषण घटना घडली असून अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Accident (PC- File Photo)

समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स अपघाताची घटना ताजी असताना, समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने समोरून जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील 20 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. छत्रपतीसंभाजीनगर शहराजवळील सावंगी परिसरात ही भीषण घटना घडली असून अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा - Nashik Accident News: सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; बस थेट 400 फूट दरीत कोसळली, 15 ते 20 प्रवासी असल्याचा अंदाज)

खुराणा ट्रॅव्हल्सची खासगी बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. बस छत्रपती संभाजीनगर शहरातील सावंगी परिसरात आली असता, लोखंडी सळया वाहून नेणाऱ्या ट्रकला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की बसच्या कॅबिनचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात तब्बल 25 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याने समृद्धी महामार्गाबाबत मोठी टीका करण्यात आली होती. या अपघातानंतर खासगी बसच्या प्रवास सुरक्षतेविषयी प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे. एकीकडे विदर्भ ट्रॅव्हल्स अपघाताची चौकशी सुरू असताना, दुसरीकडे खुराणा ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.