Rape Threats To Daughter of Virat Kohli Case: विराट कोहलीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणाऱ्या आरोपीविरोधातील एफआयआर रद्द
आरोपी, स्टेट टॉपर असून इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), हैदराबादचा पदवीधर आहे.
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या लहान मुलीला ट्विटरवर बलात्काराची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला रामनागेश अकुबथिनीविरुद्धचा प्रथम माहिती अहवाल (FIR) मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायमूर्ती एएस गडकरी आणि न्यायमूर्ती पीडी नाईक यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील तक्रारदार कोहलीची व्यवस्थापक अक्विलिया डिसोझा यांनी आरोपींवरील आरोप वगळण्यास संमती दिल्यानंतर हा आदेश दिला.
आरोपी, स्टेट टॉपर असून इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), हैदराबादचा पदवीधर आहे. याने 24 ऑक्टोबर रोजी भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तान विरोधातील टी-20 विश्वचषक सामना गमावल्यानंतर कोहली आणि शर्मा यांच्या 10 महिन्यांच्या मुलीविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आणि दावा केला की खटल्यातील कार्यवाही सुरू ठेवल्याने त्याच्या वयक्तिक आयुष्यावर परिणाम होईल असे म्हटले आहे. जेईई (प्रगत) परीक्षेत गुणवंत विद्यार्थी आणि रँकधारक असल्याचा दावाही त्याने केला.
अधिवक्ता अभिजीत देसाई यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की आरोपी नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्निंग करत आहे आणि त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही किंवा नैतिक पतनाचा आरोप नाही. याचिकेत असे म्हटले आहे की प्रलंबित एफआयआरमुळे आरोपीच्या परदेशात मास्टर्ससाठी जाण्यामध्ये अडथळे येत आहे.