BMC Property Tax Hike: नववर्षात मुंबईकरांचा मालमत्ता कर वाढणार, दोन वर्षांसाठी वाढीव आकारणी
सन 2015 मध्ये मालमत्ता कर हा शेवटचा वाढवण्यात आला होता. त्यानंतर 2020 मध्ये वाढ अपेक्षित होती. मात्र करोनाच्या संकटामुळे 2020 आणि 2021 मध्ये करवाढ करण्यात आली नाही.
नव्या वर्षात मुंबई महापालिकेकडून (BMC) मुंबईकरांना (Mumbai) आर्थिक झटका मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला मालमत्ता करवाढीचा (Property Tax) बोजा मुंबईकरांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2023-2024 आणि 2024-2025 या वर्षांसाठी वाढीव कराची बिले ऑनलाइन प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे 10 ते 15 टक्के ही करवाढ आहे. पालिकेच्या या निर्णयास राजकीय पक्षांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. पुढील वर्ष निवडणुकांचे वर्ष असल्यामुळे राजकीय पक्ष आपला विरोध दर्शवण्याच्या शक्यता आहे. (हेही वाचा - Mumbai Property Tax: मुंबईत मालमत्ता करात वाढ होण्याची शक्यता)
मुंबईत दर पाच वर्षांनी मालमत्ता करात वाढ केली जाते. सन 2015 मध्ये मालमत्ता कर हा शेवटचा वाढवण्यात आला होता. त्यानंतर 2020 मध्ये वाढ अपेक्षित होती. मात्र करोनाच्या संकटामुळे 2020 आणि 2021 मध्ये करवाढ करण्यात आली नाही. 2022 मध्ये पालिका निवडणुकीची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करवाढ रोखली होती. त्यानंतर आता 2023 ते 2025 या पुढील दोन वर्षांसाठी करवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालिकेच्या कायद्यात प्रत्येक पाच वर्षांनी 40 टक्के करवाढीची तरतूद आहे. मात्र नागरिकांवर अधिक बोजा पडू नये यासाठी सर्वसाधारणपणे 15 टक्के वाढ केली जात असल्याचे करनिर्धारण व संकलन खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मालमत्ता कर वाढ जमिनीचे बाजार मूल्य किंवा इमारतीच्या भांडवली मूल्यावर एक एप्रिल 2023 रोजी अंमलात असलेल्या रेडीरेकनर दरावर आधारित असणार आहे.