Aurangabad येथे आरोग्य कर्मचाऱ्याकडून Covid-19 लसीचा काळाबाजार; 300 रुपयांना दिले जात होते डोस

औरंगाबाद जिल्ह्यातील साजापूर भागात बेकायदेशीरपणे कोविड-19 लस विकल्याप्रकरणी महाराष्ट्र आरोग्य विभागाशी संबंधित व्यक्तीला सोमवारी ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ही माहिती दिली.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-IANS)

देशात जानेवारी महिन्यात कोरोना विषाणू (Coronavirus) विरोधी लसीकरणाला सुरुवात झाली. आता जवळजवळ 7 महिने उलटूनही अनेक ठिकाणी लसीची कमतरता भासत आहे. राज्यात अजूनही लाखो लोक आहेत जे लसीच्या पहिल्या डोस पासूनही वंचित आहेत. अशात औरंगाबाद (Aurangabad) येथे लसीचा काळाबाजार होत असल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील साजापूर भागात बेकायदेशीरपणे कोविड-19 लस विकल्याप्रकरणी महाराष्ट्र आरोग्य विभागाशी संबंधित व्यक्तीला सोमवारी ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ही माहिती दिली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्रापासून 20-25 किमी अंतरावर एका खोलीत लसीचे डोस विकत होता. गोपनीय माहितीच्या आधारे या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य सेवक गणेश दुरोळे असे या व्यक्तीचे नाव आहे. हा 300 रुपयांच्या मोबदल्यात प्रत्येकाला लस टोचत असे.

एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दुरोळेच्या खोलीत कोव्हिशील्ड लसीची रिकामी कुपी आणि नवीन तसेच वापरलेले सिरिंज सापडले आहेत. त्यांनी अशा 10 लोकांची यादी जप्त केली ज्यांना गणेश दुरोळेने लस टोचली होती. तपासात असे समोर आले आहे की, तो येथील औद्योगिक क्षेत्रातील ठेकेदारांशी संपर्क साधायचा आणि लसीचे डोस घेऊन ते पुढे 300 रुपये प्रति डोस दराने द्यायचा. (हेही वाचा: Delta Plus Variant: चिंताजनक! महाराष्ट्रातील कोरोनाच्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या वाढली, पाहा ताजी आकडेवारी)

औरंगाबादमध्ये कोरोना लसीचा सातत्याने तुटवडा आहे. अशा परिस्थितीत लसीचा हा काळाबाजार पुढे आल्याने शहरात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 1, 43, 867 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 243 रुग्णांवर उपचार सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज 21 जणांना सोडण्यात आले आहे व एकूण 13 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,47,623 झाली आहे.