लिलावती हॉस्पिटल ( फोटो सौजन्य- फेसबुक )

मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) 1250 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. हॉस्पिटल ट्रस्टने माजी विश्वस्त, उपकरणे पुरवठादार आणि विक्रेत्यांविरुद्ध कथित गैरव्यवहारासाठी एफआयआर दाखल केला आहे. 7 माजी विश्वस्तांसह एकूण 17 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन एफआयआर दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंह यांनी 11 मार्च रोजी याबाबत पत्रकार परिषद घेतली. ट्रस्टच्या सध्याच्या विश्वस्तांचा आरोप आहे की, रुग्णालयाशी संबंधित खरेदीमध्ये घोटाळे करून मोठ्या प्रमाणात निधी बेकायदेशीरपणे वळवण्यात आला.

ताज्या एफआयआरमध्ये 14 माजी विश्वस्त आणि 3 खाजगी कंपन्यांची नावे आहेत. गेल्या 20 वर्षांत वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी-विक्रीच्या नावाखाली 1250 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. यासह वांद्रे येथील या प्रसिद्ध रुग्णालयाच्या प्रशासनावर रुग्णालयाच्या आवारात काळी जादू केल्याचाही आरोप आहे. संचालक परमबीर सिंग यांनी आरोप केला आहे की, माजी विश्वस्तांनी रुग्णालयाच्या आवारात सध्याच्या विश्वस्त मंडळाविरुद्ध काळी जादू केली होती.

लीलावती रुग्णालयाचे सध्याचे विश्वस्त प्रशांत मेहता दररोज ज्या कार्यालयात बसतात, त्या कार्यालयाच्या जमिनीखाली हाडे आणि मानवी केसांनी भरलेले आठ कलश पुरलेले आढळल्याचे सांगितले जाते. विश्वस्तांनी वांद्रे पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दाखल केली आहे. यानंतर, रुग्णालय व्यवस्थापनाने हे प्रकरण वांद्रे न्यायालयात नेले, जिथे काळ्या जादूच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकरणात काय बाहेर येते आणि रुग्णालयाच्या परिसरात खरोखरच काळी जादू करण्याचा प्रयत्न झाला आहे की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Black Magic in Lilavati Hospital:

ट्रस्टी प्रशांत मेहता यांनी माजी विश्वस्तांवर काळ्या जादूच्या विधींमध्ये सहभागी असल्याचा आरोप करत म्हटले आहे की, आम्हाला लीलावती रुग्णालयातील माझ्या ऑफिस केबिनच्या फरशीखाली मानवी अवशेषांनी भरलेले आठ कलश सापडले. काही माजी कर्मचाऱ्यांनी डिसेंबर 2024 मध्ये हे माझ्या निदर्शनास आणले. या निष्कर्षांवरून असे दिसून येते की माजी विश्वस्तांनी नरबळीसारखे विधी केले होते. त्यांनी पुढे असा दावा केला की, त्यांच्या आई चारू मेहता आणि इतर कायमस्वरूपी विश्वस्तांच्या कार्यालयांच्या फरशीखाली अशाच प्रकारच्या गुप्त वस्तू सापडल्या आहेत. (हेही वाचा: Jalna Crime News: गुप्त धनाच्या लोभातून नरबळी देण्याची तयारी, भोकरदन येथून भोंदू बाबस अटक)

ते म्हणाले, आम्ही आमच्या अभियांत्रिकी विभागाला फरशी तोडण्यास सांगितले आणि सर्व काही व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केले. या वस्तू सापडल्याने कार्यालयात खूप नकारात्मक वातावरण निर्माण झाले. परमबीर सिंग यांनी या दाव्यांचे समर्थन केले आणि म्हटले की, अशा गंभीर आरोपांनंतरही, वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. म्हणून, आम्ही न्यायालयात धाव घेतली.