BJP's Sankalpa Patra Abhiyan: भाजप 'विकसित भारता'साठी 2 लाख मुंबईकरांकडून मागवणार सुचना; जाणून घ्या काय आहे 'संकल्प पत्र अभियान'

ते मुंबईकरांपर्यंत पोहोचून या सूचना गोळा करतील. तसेच मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी कलेक्शन बॉक्स ठेवण्यात येणार असून, हे बॉक्स मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून सूचना गोळा करतील.

भाजप (संग्रहित प्रतिमा)

देशाच्या विकासात सामान्य व्यक्तीचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी, मुंबई भाजपने (Mumbai BJP) नागरिकांपर्यंत पोहोचून 'विकसित भारता'साठी त्यांच्या सुचना प्राप्त करण्याची योजना आखली आहे. या सूचनांचा लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश केला जाईल. शहरवासीय 'विकसित भारत'कडे कसे पाहतात, हे समजून घेण्यासाठी पक्ष किमान 2 लाख लोकांशी संपर्क साधेल, ज्यामुळे त्यांना पक्षाच्या जाहीरनाम्याकडून काय अपेक्षा-आकांक्षा आहेत, तसेच त्यांच्या सूचना काय आहेत हे दिसून येईल. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दादर येथील भाजप कार्यालयात याबाबत माहिती दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप 15 मार्चपर्यंत देशभरात 'संकल्प पत्र अभियान' राबवणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्यासाठी सूचना गोळा करणे हा त्याचा उद्देश आहे. या विकास भारत संकल्प पत्र मोहिमेसाठी देशभरातील नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. समाजातील सर्व घटकांकडून या सूचना गोळा केल्या जातील. याशिवाय विविध औद्योगिक व सामाजिक संस्था आणि इतर उपक्रमांच्या सूचनाही स्वीकारल्या जातील.

मुंबईतील विविध आघाड्यांचे आणि मोर्चांचे सर्व अधिकारी व कार्यकर्ते या अभियानाच्या आघाडीवर असतील. ते मुंबईकरांपर्यंत पोहोचून या सूचना गोळा करतील. तसेच मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी कलेक्शन बॉक्स ठेवण्यात येणार असून, हे बॉक्स मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून सूचना गोळा करतील. त्याशिवाय भाजपचे पदाधिकारी घरोघरी जाऊन या सूचना गोळा करणार आहेत. (हेही वाचा: Raj Thackeray Pune Meeting: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील पदाधिकाऱ्यांवर संतापले, विभाग प्रमुखांची बैठक न घेताच राज ठाकरे मुंबईला रवाना)

सनदी लेखापाल, वकील, शिक्षक, डॉक्टर, आयटी व्यावसायिक, व्यापारी, गायक, अभिनेते, क्रीडा व्यक्तिमत्व, अभियंते, माजी सैनिक, पत्रकार आणि इतरांसह प्रख्यात व्यक्तींकडून सूचना गोळा केल्या जातील. याशिवाय मुंबईकर 9090902024 वर मिस कॉल देऊ शकतात आणि संकल्प पत्रासाठी त्यांच्या सूचना नोंदवू शकतात. आमदार आशिष शेलार म्हणाले की, यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नमो ॲप'च्या माध्यमातूनही सूचना पाठविण्याची तरतूद करण्यात आली आहे. निवडणुकीला जाण्यापूर्वी सर्वसामान्यांकडून मते, अपेक्षा आणि सूचना मागविण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल, असे ते म्हणाले.