मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात; शिवसेना प्रवक्त्या अॅड मनिषा कायंदे यांचा आरोप

या मोर्चामागे भाजपचा हात असून मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेनेला काहीही फरक पडत नाही. भाजपला नेहमीच इतर पक्षांच्या कुबड्या लागतात, अशी टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी एबीपी माझा या वृतवाहिनीशी बोलताना केली आहे.

Shiv Sena leader Manisha Kayande (PC- ANI)

मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) आज पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेचा महामोर्चा निघणार आहे. या मोर्चामागे भाजपचा (BJP) हात असून मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेनेला काहीही फरक पडत नाही. भाजपला नेहमीच इतर पक्षांच्या कुबड्या लागतात, अशी टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी एबीपी माझा या वृतवाहिनीशी बोलताना केली आहे.

मनिषा कायंदे पुढे बोलताना म्हणाल्या, 'शिवसेनेने भाजपची साथ सोडली आहे. त्यामुळे भाजपला आता आधाराची गरज आहे. भाजपने वंचित बहुजन आघाडीचा प्रयोगही केला. मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही. त्यामुळे भाजप आता मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. आशिष शेलार यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटी घेतल्या. हे भाजप आणि मनसे एकत्र येण्याचे संकेत आहेत. या सर्वांचा विचार केल्यास आजच्या मोर्चामागे भाजप असू शकते,' असंही मनीषा कायंदे यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - पाक-बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मनसेचा आझाद मैदानावर आज महामोर्चा)

मनसेच्या या मोर्चामुळे शिवसेनेला काहीही फटका बसणार नाही. लोकांना आता कळालं आहे की, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावण्याची भूमिका कुणाची होती. बाळासाहेब ठाकरे यांची ही विचारसरणी आहे. आता त्याचीचं कॉपी केली जात आहे. मनसेची स्थापना होऊन आता 14 वर्ष झाली आहेत. परंतु, मनसेला आताच का हे सर्व आठवत आहे? असा सवालही मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे.