Nitesh Rane On Maharashtra Government: 'हे सरकार नाक दाबल्याशिवाय काहीच करत नाही का?' राज्यातील अनलॉक प्रक्रीयेवरुन नितेश राणे यांचा सवाल

यातच लवकरच शाळा, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करणार असल्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.

Nitesh Rane (Photo Credits: PTI)

कोविड-19 दुसऱ्या लाटेचा (Covid-19 Second Wave) कमी होत असलेला प्रभाव लक्षात घेत टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. यातच लवकरच शाळा, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करणार असल्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. राज्यातील अनलॉक प्रक्रीयेवरुन भाजप नेते नितेश राणे (BJP Leader Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत काही सवाल उपस्थित केले आहेत. "हे सरकार नाक दाबल्याशिवाय काहीच करत नाही का?", असा प्रश्न त्यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.

नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये लिहितात, "2 दिवसात लोकल चालू.. 17 ऑगस्ट पासून शाळा चालू.. मग 2 डोस घेतलेल्यांना.. मंदिर दर्शन का नाही ??? हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का ?? हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे." (Nitesh Rane on Thackeray Government: 'चेक द ब्रेन' म्हणत नितेश राणे यांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र)

Nitesh Rane Tweet: 

दोन दिवसांत लोकल चालू करण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तर 17 ऑगस्टपासून शाळा सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यातील 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करत दुकाने, जिम, व्यायामशाळा, ब्युटी पार्लर्स, योगा केंद्र रात्री 8 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र मंदिरं खुली करण्याबाबत कोणताही निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला नाही. त्यावरुनच नितेश राणे यांनी सरकारवर हिंदूंवर अन्याय करत असल्याचे म्हटले आहे.

तसंच लसीकरण पूर्ण झालेल्या सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याची मागणी भाजपकडून वारंवार होत होती. मात्र काल भाजपच्या आंदोलनानंतर लस घेतलेल्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय 2-3 दिवसांत समजेल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्यावरुन हे सरकार नाक दाबल्याशिवाय काहीच करत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.