Vidhan Sabha Election 2024: भाजपला धक्का, पराग शाह पडले; घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रचारावर परिणाम
त्यामुळे मतदारसंघामध्ये निवडणूक प्रचारामध्ये पक्षाला मर्यादा आल्या आहेत.
विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार ऐन रंगात आला आहे. राजकीय नेत्यांची धावपळ वाढली आहे. त्यामुळे धावपळीतही उर्जा कायम ठेवण्यासाठी या नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. दरम्यान, प्रचाराची रणधुमाळी सुरु असतानाच मुंबई येथील घाटकोपर पूर्व विधानसभा (Ghatkoper East Vidhan Sabha) मतदारसंघातील भाजप उमेदवार पराग शाह (Parag Shah) पडले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात पक्षाच्या प्रचारावर मर्यादा आल्याने भाजपला धक्का बसला आहे. प्राप्त माहितीनुसार, पराग शाह हे त्यांच्याच घरी पाय घसरुन पडले आहेत. ज्यामुळे त्यांच्या डाव्या पायाचे हाड दुखापतग्रस्त झाले आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टारांनी त्यांना घरीच थांबून पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दुसऱ्या बाजूला शिवडी येथील मनसे उमेदवार बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) हे देखील दुखापतग्रस्त झाले आहेत.
राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार
पराग शाह हे विधासभा निवडणूक 2024 मधील राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. भाजपची उमेदवारी त्यांनी पक्षांतर्गत स्पर्धा जिंकून मिळवली आहे. सुरुवातीचे काही काळ तर पक्षातून त्यांना तिकीट मिळणार नाही, अशीच चर्चा होती. त्यांच्या ऐवजी या मतदारसंघातून भाजप प्रकाश मेहता यांना तिकीट देईल असे बोलले जात होते. मेहता हे देखील विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा पत्ता कापत भाजपने शाह यांना तिकीट दिले. (हेही वाचा, Maharashtra's Richest Candidate: भाजपचे पराग शाह राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार; आमदाराच्या संपत्तीत 575% वाढ)
तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला
पराग शाह यांनी आपल्या निवडणूक पत्रात आपली संपत्ती 3000 कोटी रुपये इतकी असल्याचे म्हटले आहे. सहाजिकच आर्थिकदृष्ट्या धनाड्य असलेला उमेदवार दिल्यास त्याचा पक्षालाही फायदा होतो. त्यात घाटकोपरसारख्या राजकीयदृष्ट्या आव्हानात्मक मतदारसंघात भाजपला असा तगडा उमेदवार हवाच होता. दरम्यान, आता हाच उमेदवार आता जायबंदी झाल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी शाह यांना तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, शस्त्रक्रिया केल्यास आणखी काही काळ सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल, परिणामी प्रचारावर मर्यादा येतील. त्यामुळे शाह यांनी तुर्तास तरी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार केल्याचे समजते. (हेही वाचा, Devendra Fadnavis On Amit Thackeray: अमित ठाकरे यांच्याबद्दल भाजपला उमाळा कायम; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची लालसा नाही)
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बाळा नांदगावकर हे देखील दुखापतग्रस्त झाले आहेत. निवडणूक प्रचार करताना त्यांच्याही पायाला 2 नोव्हेंबर रोजी दुखापत झाल्याचे पुढे आले होते. त्यामुळे त्यांनी चार दिवस घरातच राहुन विश्रांती घेतली. त्यांनंतर आता ते व्हिलचेअर वापरत प्रचार करत आहेत.