Fake COVID-19 Vaccine Scam: मुंबईमध्ये बनावट कोविड-19 लसीचा मोठा घोटाळा; 10 वी पास सूत्रधारासह 5 जणांना अटक

मात्र जेव्हा लोकांना प्रमाणपत्र मिळाले, तेव्हा त्यावरील वेळ, तारीख चुकीची नमूद केल्याचे आढळून आले.

Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

सध्या देशामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणू लसीकरण (Covid-19 Vaccination) मोहीम राबवली जात आहे. लोकही लस घेण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. या लसीचे महत्व इतके वाढले आहे की, अनेक ठिकाणी प्रवास करताना लस घेतलेली असणे बंधनकारक आहे. याच परिस्थितीचा फायदा घेऊन अनेक ठिकाणी बनवत लस घोटाळे (Fake COVID-19 Vaccine Scam) होत असल्याचे समोर आले आहे. नुकतेच मुंबईतील (Mumbai) कांदिवली परिसरातील हाय प्रोफाइल हिरानंदानी हेरिटेज इमारतीत फेक व्हॅक्सिन ड्राईव्ह पार पडले असल्याची तक्रार मिळाली होती. आता या प्रकरणात या रॅकेटचा खुलासा करत मुंबई पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.

कांदिवली हिरानंदानी हेरिटेज येथे 30 मे रोजी लस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सोसायटीच्या व्यवस्थापनाने मुंबईच्या अंधेरी परिसरातील सुप्रसिद्ध रुग्णालयाच्या महेंद्रसिंग नावाच्या पीआरओशी संपर्क साधला होता. महेंद्रसिंगने संजय गुप्ता नावाच्या मध्यस्थीमार्फत हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये लसीकरण केले. लस दिल्यांनतर 4-5 दिवसानंतर प्रमाणपत्र मिळेल असे सोसायटीच्या लोकांना सांगण्यात आले. मात्र जेव्हा लोकांना प्रमाणपत्र मिळाले, तेव्हा त्यावरील वेळ, तारीख चुकीची नमूद केल्याचे आढळून आले.

हा प्रकार संशयास्पद वाटल्याने सोसायटीमधील लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. आता मुंबई पोलिसांनी फसवणुकीसह अनेक कलमांखाली एफआयआर नोंदविला आहे. मुंबई पोलिसांचे उत्तर विभाग अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांच्या म्हणण्यानुसार तपासात असे दिसून आले आहे की-

यातील पहिला आरोपी महेंद्रसिंग हा 10 वी नापास आहे जो या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे. महेंद्र हा 17 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहे आणि त्याचे मुंबईतील अनेक नामांकित रुग्णालये आणि डॉक्टरांशी संपर्क आहेत. महेंद्रसिंगच्या खात्यातून 9 लाख रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत. दुसरा आरोपी संजय गुप्ता, सोसायटीमध्ये कॅम्प ऑर्गनायझर म्हणून काम करतो. तिसरा आरोपी ललित उर्फ ​​चंदन सिंह हा मुंबईतील नामांकित रुग्णालयात काम करतो. ललितवर कोविन अॅपवरून डेटा चोरी करण्याचा आरोप आहे, ज्याच्या मदतीने तो बनावट प्रमाणपत्रे तयार करीत असे. (हेही वाचा: बनावट लस घोटाळयामध्ये Tips Industries ची फसवणूक; 365 कर्मचार्‍यांना अद्याप प्रमाणपत्र मिळाले नाही- Ramesh Taurani)

चौथा आरोपी नितीन मोंडे हादेखील कोविनवरून डेटा चोरत असे. करीम अकबर अली हा पाचवा आरोपी असून, तो लस आणत असे. दरम्यान, टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Tips Industries Ltd) प्रमुख, बॉलिवूड चित्रपट निर्माते रमेश तौरानी (Ramesh Taurani) यांनी आपल्या कंपनीमध्येही लसीकरणाबाबत मोठा घोटाळा झाला असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या कंपनीमध्येही संजय गुप्ताने लसीकरण केले होते.