लहान मुलांच्या क्रिकेटमुळे कोल्हापूर मध्ये मोठी हाणामारी; दगडफेकीत 3 पोलिसांसह 9 जण जखमी (Video)
या घटनेत पोलिसांसह 10 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी (4 जून) रात्री हा वाद सुरु झाला आणि बघता बघता या वादाने हाणामारीचे रूप घेतले. याप्रकरणी सध्या पोलिसांनी 12 लोकांना ताब्यात घेतले आहे.
लहान मुलांच्या क्रिकेटमधील किरकोळ वादावरून कोल्हापुरात (Kolhapur) दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या वादामध्ये मारामारी, दगडफेक, बाटल्यांची तोडफोड करण्यात आली. कोल्हापूर मधील सोमवार पेठेतील महाराणा प्रताप चौक परिसरात ही घटना घडली. या घटनेत पोलिसांसह 10 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी (4 जून) रात्री हा वाद सुरु झाला आणि बघता बघता या वादाने हाणामारीचे रूप घेतले. याप्रकरणी सध्या पोलिसांनी 12 लोकांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार पेठ परिसरात सकाळी लहान मुलांमध्ये क्रिकेटचा सामना खेळला गेला होता. यावरून संध्याकाळी दोन गटांमध्ये वाद सुरु झाला. या वादामध्ये मोठ्या माणसांचा हस्तक्षेप झाल्याने वादाला हाणामारीचे स्वरूप प्राप्त झाले. त्यानंतर एकमेकांच्या घरांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड, काचेच्या बाटल्या फोडणे असे प्रकार घडले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. (हेही वाचा: कोल्हापूर: गेम खेळताना मोबाईलचा स्फोट झाल्याने मुलाने डोळा गमावला)
पोलिसांना ही बातमी कळताच पोलीस या परिसरात पोहचले. मात्र जमावाने पोलीस आणि त्यांच्या गाड्यांवरही दगडफेक केली. त्यानंतर मोठा पोलीसफाटा मागवण्यात आला व परिस्थिती नियंत्रण आणली गेली. यामध्ये पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस आणि इतर 9 लोक जखमी झाले आहेत. रात्री 8 च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.