Kalyan Crime News: कल्याण येथे नामांकीत ज्वेलर्सकडून ग्राहकांना दीड कोटींचा चुना; मासिक भिशी योजनेच्या नावाखाली फसवणूक

फसवणूक झालेल्या ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार कल्याण येथील महात्मा फुले पोलीस स्टेशन (Mahatma Phule Police Station) दप्तरी गुन्हा नोंद झाला आहे.

Gold Jewelery | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

विविंध शहरं आणि गावांतील अनेक ज्वेलर्स (Jewelers) ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध योजना जाहीर करतात. यात मुदत ठेवीवर आकर्षक परतावा देण्यासोबतच मासिक भिशी आणि तशाच काही इतरही योजनांचा समावेश असतो. या योजना आकर्षक असल्याने ग्राहकही त्याकडे आकृष्ट होतात. मात्र, हेच आकर्षण अनेकदा ग्राहकांना मोठा आर्थिक तोटा आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकवते. कल्याण (Kalyan) येथील एका नामांकीत ज्वेलर्सकडूनही असाच काहीसा प्रकार घडला आहे. येथील एका ज्वेलर्सकडून ग्राहकांना चक्क 1 कोटी 50 लाखांना गंडा (Jewelers Fraud) घातला गेल्याचा आरोप आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार कल्याण येथील महात्मा फुले पोलीस स्टेशन (Mahatma Phule Police Station) दप्तरी गुन्हा नोंद झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ग्राहकांनी मे. एस. कुमार गोल्ड अॅन्ड डायमंडचे संचालक श्रीकुमार पिल्लई यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकुमार पिल्लई हे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे समजते. मे. एस. कुमार गोल्ड अॅन्ड डायमंड नामक एक ज्वेलर्स कल्याण पश्चिम परिसरात आहे. या ज्वेलर्सन ग्राहकांसाठी मासिक भिशी, फिक्स्ड डिपॉझिट यांसारख्या योजना जाहीर केल्या. त्यातून ग्राहकांना आकर्षक परतावा देण्याचेही आमिष दाखवले. ही योजना चार वर्षे कालावधीसाठी होती. धक्कादायक म्हणजे ज्वेलर्सकडून ग्राहकांना सांगण्यात आले होते की, गुंतवलेल्या रकमेला थोडेथोडके नव्हे तर तब्बल 14 ते 18% व्याजदराने परतावा दिला जाईल. (हेही वाचा, Online Fraud In Pune: पुण्यात महिलेची ऑनलाईन फसवणूक, गमावले 45 हजार)

ज्वेलर्सच्या योजनेला भुलून अनेक ग्राहकांनी मोठ्या रकमेची गुंतवणूक केली. फसवणूक झालेल्या ग्राहकांची गुंतवलेली रक्कम साधारण 1 कोटी 56 लाख 74 हजार 539 रुपये घरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. आतापर्यंत 24 ग्राहकांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. ग्राहकांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चौकशी केली असता संबंधित ज्वेलर्स सध्या बंद आहे. तसेच, ज्वेलर्सचा मालकही सध्या फरार आहे. एस. कुमार ज्वेलर्सचे देशभरात एकूण 13 शोरुम असल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्राहकांची अशा प्रकारे फसवणुक होण्याची ही पहीलीच वेळ नाही. या आधीही अनेक घटना अशाच स्वरुपाच्या घडल्या आहेत. तरीही लोक विश्वासाने गुंतवणूक करतात. त्यातील अनेक ज्वेलर्स ठरल्याप्रमाणे परतावाही देतात. काही मात्र ग्राहकांची मोठी फसवणूक करुन परागंदा होतात.