IPL Auction 2025 Live

Bhim Jayanti 2023: यंदा भीमजयंतीचं औचित्य साधत अवकाशात तार्‍याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे रजिस्ट्री; space-registry.org वर तुम्हीही पाहू शकाल तारा

यंदा तार्‍याला थेट बाबासाहेबांचं नाव देत हा भीम जयंतीचा दिवस अविस्मरणीय केला जाणार आहे.

Dr. Ambedkar | Wikipedia

भीम अनुयायी यंदा 14 एप्रिल दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची 132वी जयंती साजरी करणार आहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन अर्थात भीम जयंती (Bhim Jayanti) थोडी स्पेशल केला जाणार आहे. यंदा त्यांच्या नावे अवकाशामध्ये एका तार्‍याची रजिस्ट्री करण्यात आली आहे. म्हणजेच 14 एप्रिलला या तार्‍याचं नामकरण होणार आहे. भीम अनुयायी सोबतच सारे जण हा तारा मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅब द्वारा पाहू शकणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी या ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे.

'इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री' संस्थेकडून अवकाशातील तार्‍यांना नाव दिले जाते. ही एक अमेरिकन संस्था आहे. ही सुविधा सशुल्क आहे. साधारण 9 हजार रूपये खर्च करून राजू शिंदे यांनी अवकाशामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे तार्‍याची नोंद करून घेतली आहे. त्याचं प्रमाणपत्र राजू शिंदे यांच्याकडे आलं असून तार्‍याचं लॉन्चिंग 14 एप्रिल दिवशी होणार आहे. सामान्य नागरिक space-registry.org या स्पेस रजिस्ट्री ॲपच्या संकेतस्थळावरून हा तारा पाहू शकणार आहेत. नक्की वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा इतिहास, पाहा कोणी केली पहिल्यांदा भीम जयंती साजरी.

मुंबई मध्ये चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण आणि भीम जयंती दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्रित नागरिक जमतात. बाबासाहेब आंबेडकर यांना आपली आदरांजली अर्पण करतात. या दिवसाचं औचित्य साधत अनेक जण त्यांचे अनमोल विचार, शिकवण समाजात रूजवण्याचे प्रयत्न करतात. या दिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. पण यंदा तार्‍याला थेट बाबासाहेबांचं नाव देत हा दिवस अविस्मरणीय केला जाणार आहे.