IPL Auction 2025 Live

Bharat Jodo Yatra: कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रवेश; Sharad Pawar होणार सहभागी

7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरुवात झाली आणि जम्मू-काश्मीरमध्ये तिचा समारोप होईल.

Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

देशात सध्या सुरु असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत (Congress Bharat Jodo Yatra) शरद पवार (Sharad Pawar) सहभागी होणार आहेत. कॉंग्रेसच्या या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून समाजात एकोपा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याने, आपण यामध्ये सहभागी होणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सांगितले. पीटीआयशी बोलताना पवार म्हणाले की, प्रदेश काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी त्यांची भेट घेतली होती आणि 7 नोव्हेंबर रोजी राज्यात प्रवेश करत असलेल्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 150 दिवसांत 3,570 किमी अंतर कापणार आहे. 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरुवात झाली आणि जम्मू-काश्मीरमध्ये तिचा समारोप होईल. यात्रेचे नेतृत्व करत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांचा दौरा केला आहे. नोव्हेंबरमध्ये ही यात्रा महाराष्ट्रात येईल.

दिवाळी निमित्त बारामती येथे संपूर्ण पवार कुटूंब एकत्र आले आहे. यानिमित्त रविवारी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘भारत जोडो यात्रा हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे. मात्र या उपक्रमातून समाजात एकोपा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आमच्यापैकी काही वेगवेगळ्या पक्षातील लोक या यात्रेत सामील होतील.’

यावेळी आणखी एका प्रश्नावर पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवडणुकांमध्ये राजकारण केले जात असल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘काही क्षेत्रे अशी आहेत जिथे राजकारण आणू नये. जे हे करतात ते अज्ञानी आहेत. मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना नरेंद्र मोदी गुजरातचे प्रतिनिधी होते, अरुण जेटली दिल्लीचे, तर अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधीत्व करत होते. त्यावेळी आम्ही सर्वांनी एकत्र काम केले होते. आमचे काम हे खेळाडूंना सुविधा पुरवण्याचे होते.’ (हेही वाचा: Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सूनची माघार)

विश्वचषक विजेते रॉजर बिन्नी यांची अलीकडेच बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, ज्यांनी सौरव गांगुली यांच्याकडून जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड चालवण्याचा कार्यभार स्वीकारला. जय शहा यांची सलग दुसऱ्यांदा सचिवपदी निवड झाली. खजिनदार आशिष शेलार, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सहसचिव देवजित सैकिया यांचीही बिनविरोध निवड झाली.

रविवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर पवार म्हणाले, ‘शेतकऱ्यांना भेटण्यासाठी ते फिरत आहेत हे चांगलेच आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या राज्यासमोर, केंद्रासमोर ठेवाव्यात आणि दोन्ही सरकारांकडून शेतकऱ्यांना फायदा झाला तर उत्तमच आहे.’