Covid 19 रुग्णांसाठी BEST Buses चे अॅम्ब्युलन्स मध्ये रुपांतर; मुंबई मधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे BMC चे महत्त्वपूर्ण पाऊल
Best Buses as Ambulances for Covid 19 Patients | (Photo Credits: Twitter)

भारत देश सध्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाखाली आहे. देशातील कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्र राज्यात आहे. त्यामुळे निश्चितच राज्य सरकारवरील जबाबदारी अधिक आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यात मुंबई (Mumbai) अग्रस्थानी आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विशेष उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसंच कोरोना रुग्णांसाठी विशेष सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबई महानगरपालिकेने बेस्ट बसेसचे (BEST Buses) रुपांतर अॅम्बुलन्समध्ये (Ambulance) केले आहे. त्याचबरोबर त्यात विशेष सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत.

नाशवंत जीवावश्यक वस्तूंच्या वाहतूकीसाठी यात एसीची सुविधा देण्यात आली आहे. एअरटाईट पार्टिशन सह बसण्यासाठी निवडक जागांची सोय करण्यात आली आहे. तसंच यामुळे अॅम्बुलन्स सेवेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. (कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांना Fight Against Coronavirus मध्ये सहभागी होण्याची संधी; रक्तदान करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी BMC कडून खास Email ची सोय)

BMC Tweet:

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने साऱ्या व्यवहारांसह सार्वजनिक वाहतूक देखील बंद आहे. त्यामुळे बंद असलेल्या बसेसचा सदुपयोग करत पालिकेने कोरोना रुग्णांसाठी ही सेवा सुरु केली आहे. तसंच BMC ने कोविड 19 रुग्णांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. तसंच रक्तदानासाठी विशेष ईमेल आयडी उपलब्ध करुन दिला आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे 4205 रुग्ण आहेत. त्यापैकी 413 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. तर 167 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.