Rajgad Honey Be Attack: राजगडावर मधमाश्यांचा पर्यटकांवर हल्ला, पळापळीत महिला दरीत कोसळली

रोहिणीच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना नसरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Rajgad Fort (Photo Credit - Wikimedia Commons)

राजगड किल्ल्यावर (Rajgad) येणाऱ्या पर्यटकांवर मधमाश्यांनी (Honey Be Attack) हल्ला केला. रोहिणी सागर वरात (25, वाकड, पुणे) ही मधमाशांपासून जीव वाचवण्यासाठी पळत असताना किल्ल्यावरील खोल दरीत पडल्याने ती गंभीर जखमी झाली. मधमाशांच्या हल्ल्यात महिलेच्या पतीसह दहा पर्यटक जखमी झाले. जखमींमध्ये वाकड, पुणे आणि बेळगाव येथील पर्यटकांचा समावेश आहे. बांबूच्या पोत्यातून रोहिणीला खोल दरीतून बाहेर काढण्यासाठी गडाचे रक्षक, स्थानिक मावळी तरुण आणि पोलिसांनी अक्षरश: जीव धोक्यात घालून बाहेर काढले. हा अपघात शनिवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास राजगड किल्ल्यातील सुवेळा माची येथे घडला. रोहिणीच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना नसरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मधमाश्यांनी पर्यटकांवर केला हल्ला

शुक्रवारी रोहिणी, तिचा पती सागर वरात, सासू आणि, पुतण्या यश बापूराव घागरे हे तिघेही राजगड येथे मुक्कामी थांबले होते. शनिवारी सकाळी सर्वजण राजगड येथील माची येथे फिरण्यासाठी गेले होते. रोहिणी पती व नातेवाइकांसह बालेकिल्ला येथील सुवेळा माची येथून पद्मावती माचीकडे परत जात होत्या. त्यावेळी बेळगावातील आठ ते दहा पर्यटकही बालेकिल्लाच्या दिशेने चालले होते.

त्याच वेळी तेथील एका कड्याच्या पोळ्यातील मधमाश्यांनी पर्यटकांवर तुफान हल्ला केला. मधमाश्यांनी रोहिणी, सागर व इतर पर्यटकांचा चावा घेतला. जिवाच्या आकांताने सर्वजण जोरदार ओरडू लागले. सैरावैरा धावताना कड्याजवळील तटबंदीवरून रोहिणी या जवळपास दोनशे फूट खोल दरीत कोसळल्या. मधमाश्यांच्या हल्ल्यात त्यांचे पती गंभीर जखमी झाले. (हे देखील वाचा: KDMC: केडीएमसी मुख्याल्यात मधमाशांची दहशत, महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांकडून चिंतेचा विषय)

किल्ल्यात पुरातत्व विभागाचे रक्षक बापू साबळे, सुरक्षा रक्षक अक्षय कचरे, विशाल पिलावरे, दीपक पिलावरे हे घटनास्थळी पोहोचले. रोहिणीला खोल दरीतून बाहेर काढण्यात आले. नंतर तेथून बांबूच्या झोळीत घालून धावपळ करीत कडे-व -कपाऱ्यातून गडाच्या पायथ्याला आणले. तोपर्यंत डॉ.राहुल बोरसे पाटील, वेल्हे पोलीस ठाण्याचे औदुंबर अडवाल, ज्ञानेश्वर शेगे, ज्ञानेश्वर दिवार, वैजनाथ घुमरे यांचे पथक शासकीय रुग्णवाहिकेत दाखल झाले. रोहिणीला रुग्णवाहिकेतून नसरपूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.