बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा भूमिपूजन सोहळा 27 जुलै रोजी; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
या संदर्भातील महत्त्वाची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं (BDD Chawls Redevelopment) मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या संदर्भातील महत्त्वाची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. 27 जुलै रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा भूमिपूजन समारंभ पार पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित राहणार आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच मुंबईकरांच स्वप्न... 27 जुलै रोजी पुनर्विकासाचा भूमिपूजन समारंभ! मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व मा .शरदचंद्र पवार ह्यांच्या उपस्थित ... इतिहासात नोंद होईल."
जितेंद्र आव्हाड ट्विट:
दरम्यान, बीडीडी चाळ पुनर्विकासात कोणीही बेघर होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले होते. बीडीडी चाळ पुनर्विकास हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो सुनियोजितपणे पूर्ण होईल असे प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले होते. त्याचबरोबर पोलिस क्वार्टरच्या पुनर्विकासाची व पुनर्वसनाची रूपरेषा तयार करणे, निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना आणि मृत पोलिसांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय उपलब्ध करुन देणे आणि त्यांचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले होते.