Baramati Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणूतील विजयानंतर मतदार, कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी सुप्रिया सुळे मतदारसंघात दाखल; पुण्यात जंगी स्वागत!
सुप्रिया सुळे यांच्यावर गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी फेर धरत त्यांचे पुणे आणि बारामती मध्ये स्वागत केले आहे.
बारामती (Baramati) मध्ये यंदा लोकसभा निवडणूक मोठी प्रतिष्ठेची होती. पवार विरूद्ध पवार या लढाईमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती पण खासदारकीचा चौकार मारत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर मात केली आहे. या निवडणूकीमध्ये पुन्हा सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर आज त्या आपल्या मतदारसंघामध्ये पुन्हा आल्या तेव्हा अनेक कार्यकर्त्यांना भावना अनावर झालेल्या पहायला मिळाल्या. सुप्रिया सुळे यांच्यावर गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी फेर धरत त्यांचे पुणे आणि बारामती मध्ये स्वागत केले आहे.
बारामती मध्ये पोहचल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मतदारांनी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय ला नाकारल्याचं म्हटलं आहे. मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानताना हा विजय त्यांचा असल्याचं म्हटलं आहे. हे वर्ष कठीण होते. आम्ही शेतकर्यांच्या प्रश्नावर, पाण्याच्या प्रश्नावर, बेरोजगारीवर लढाई लढली आहे. आता उद्यापासून आपण दुष्काळग्रस्त भागाला भेटी देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Baramati Loksabha: मतदानादिवशी बारामतीत शरद पवार गटाकडून 28 तक्रारी दाखल, पण दोन तक्रारींची दखल .
बारामती मध्ये मविआ चे उमेदवार सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यावर 158333 मतांनी विजय मिळवला आहे. सुप्रिया सुळेंना 732312 मतं पडली आहेत तर सुनेत्रा पवार यांना 573979 मतं पडली आहेत. निवडणूक निकालानंतर काल सुप्रिया सुळे शरद पवारांसोबत इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीला गेल्या होत्या त्यानंतर आज त्या मतदारसंघात आल्या आहेत. दरम्यान सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर्स अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील टाईम्स स्क्वेअर वर देखील पहायला मिळाले आहेत.