Baramati News: बारामती येथील खांडज येथे सांडपाण्याच्या चेंबरमध्ये गुदमरून चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. अतिशय हृदयद्रावक अशा या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सांगितले जात आहे की, हे चारही जण सांडपाण्याचा चेंबर साफ करत होते.

Sewage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) जिल्ह्यातील बारामती (Baramati) तालुक्यातील खांडज (Khandaj) येथील चार जणांचा वाहत्या सांडपाण्याच्या चेंबरमध्ये गुदमरुन मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. अतिशय हृदयद्रावक अशा या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सांगितले जात आहे की, हे चारही जण सांडपाण्याचा चेंबर साफ करत होते. याच वेळी त्यांचा श्वास गुदमरला. त्यांना पुरेसा श्वास वेळेत घेता आला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, श्वास गुदमरल्याने हे चौघेही बेशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी या चौघांनाही मृत घोषीत केले. एकाच वेळी चौघांची प्राणज्योत इतक्या दुर्दैवी पद्धतीने मालवली जावी याबाबत परिसरात दु:ख व्यक्त केले जात आहे. (हेही वाचा,अंबरनाथ: रंगकाम करण्यासाठी बोलावलेल्यांना कामगारांना दिले टाकीसफाईचे काम, तिघांचा श्वास गुदमरुन मृत्यू )

अधिक माहिती अशी की, सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी चौघांपैकी एक जण खाली उतरला होता. मात्र, खाली उतरलेला व्यक्ती टाकीतच अडकल्याने त्याला वाचविण्यासाठी बाकीचे तिघे टकीत उतरले. या वेळी त्यांचाही श्वास गुदमरुन मृत्यू झाला.