Bandra-Madgoan bi-weekly Train: कोकणात जाण्यासाठी आता पश्चिम मार्गावरून आठवड्यातून दोनदा धावणार वांद्रे- मडगाव ट्रेन; इथे पहा वेळा, थांबे

यामध्ये बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदूर्ग, सावंतवाडी, थिविम, करमाळी स्थानक असणार आहे.

Indian Railways Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोकणामध्ये जाण्यासाठी आतापर्यंत सार्‍याच ट्रेन या मध्य रेल्वे मार्गावरून जात होत्या पण आता नियमित आठवड्यातून दोनदा पश्चिम रेल्वे (WR) मार्गावरून ट्रेन धावणार आहे. 29 ऑगस्ट दिवशी या नव्या ट्रेनची सुरूवात होणार आहे. मुंबई मधील पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिनल्स (Bandra Terminus) ते गोव्याचे मडगाव (Madgoan) पर्यंत ही ट्रेन धावणार आहे. त्यामुळे आता कोकणात मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणार्‍या प्रवाशांना फायदा होणार आहे. 7 सप्टेंबरला गणपतीच्या आगमनापूर्वी ही नवी ट्रेन आता प्रवाशांच्या सेवेत रेल्वेकडून दाखल करण्यात आली आहे. नक्की वाचा: Ganpati Festival 2024 Special Trains By WR: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍यांना पश्चिम रेल्वेकडून चालवल्या जाणार 6 स्पेशल ट्रेन; इथे पहा संपूर्ण यादी. 

मुंबई मध्ये 29 ऑगस्टला बोरिवली स्थानकातून या नव्या ट्रेनचं उद्घाटन होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍याच्या माहितीनुसार, कॉर्ड लाइन नसताना, त्यांना त्यांच्या सिस्टीममधून कोकणकडे जाणाऱ्या गाड्या चालवण्यासाठी वसई रोडवर उत्तरेकडून दक्षिणेकडे दिशा बदलावी लागेल, जी वेळ घेणारी असेल आणि इतर गाड्यांच्या वेळांवर परिणाम होऊ शकतो.

वांद्रे- मडगाव ट्रेन वेळापत्रक

वांद्रे- मडगाव ट्रेन ही आठवड्यातून दोनदाच धावणार आहे. मडगाव मधून वांद्रे च्या दिशेने दर मंगळवार आणि गुरूवारी गाडी असेल जी मडगाव हून सकाळी 7.40 आणि वांद्रे इथे रात्री 11.40 वाजता पोहचणार आहे. तर वांद्रे स्थानकातून दर बुधवार आणि शुक्रवार गाडी असेल जी वांद्रे येथून सकाळी 6.50 ला सुटेल आणि मडगावला रात्री 10 वाजता पोहचेल.

वांद्रे- मडगाव ट्रेनचे थांबे

वांद्रे- मडगाव ट्रेनला एकूण 13 थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदूर्ग, सावंतवाडी, थिविम, करमाळी स्थानक असणार आहे. दरम्यान प्रवाशांकडून या ट्रेनचे थांबे वाढवण्याची मागणी होत आहे.

दरम्यान या ट्रेनला 20 LHB असणार आहेत.