IPL Auction 2025 Live

Thane: मोबाईल घेण्याच्या बहाण्याने लंपास केले दोन महागडे मोबाईल; घटना सीसीटीव्हीत कैद

दुकानदाराने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो काही हाती लागला नाही.

Mobile | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मोबाईल (Mobile) विकत घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या चोरट्याने दोन महागडे मोबाईल लंपास केल्याची घटना बदलापूर (Badlapur) येथे घडली आहे. टीव्ही9 मराठीच्या वृत्तानुसार, दुकानदाराने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो काही हाती लागला नाही. पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याने तपासासाठी या फुटेजची नक्कीच मदत होईल.

बदलापूर पश्चिमेला असलेल्या श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्स दुकानात एक चोरटा मोबाईल विकत घेण्यासाठी आला. मोबाईल बघता-बघता त्याने विवो कंपनीचे दोन मोबाईल घेऊन तेथून पळ काढला. त्यावेळी त्याचा साथीदार दुकानाबाहेरच गाडी लावून उभा होता. त्याच्यासह तो बदलापूर स्टेशनच्या दिशेने पळाला. त्यावेळी दुकानातल्या मुलाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो हाती लागला नाही. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (पनवेल: सोने चोरीसाठी 60 वर्षीय व्यक्तीची गळा आवळून हत्या; 2 जण अटकेत)

याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 सप्टेंबर रोजी घडली असून अद्याप चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. (PUBG खेळण्यासाठी आईच्या खात्यातून 10 लाख रुपयांची चोरी, मुंबई येथील अल्पवयीन मुलाचे कृत्य)

दरम्यान, कोविड-19 लॉकडाऊन काळात चोरीच्या घटनांमध्ये घट झाली होती. तर सायबर क्राईमचे प्रमाण वाढले होते. मात्र आता पुन्हा एकदा चोरीची प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. काही दिवसांपूर्वी पबजी गेम खेळण्यासाठी आईच्या खात्यातून चक्क 10 लाख रुपये चोरल्याची घटना मुंबईतून समोर आली होती. त्यानंतर चिठ्ठी लिहून हा मुलगा फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आईवडीलांकडे सोपवले आहे.