पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य Babasaheb Bhimrao Patil यांचे कोरोनामुळे निधन
या प्रचारसभेला बाबासाहेब पाटील देखील उपस्थित होते.
राज्यात कोरोना विषाणूने भीषण रुप धारण केलं आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातचं आता पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बोराळे गावचे सरपंच बाबासाहेब भीमराव पाटील (Babasaheb Bhimrao Patil) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाबासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेत उपस्थिती लावली होती. पाटील यांच्या निधनामुळे बोराळे गावात शोककळा पसरली आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारसभेला अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. या प्रचारसभेला बाबासाहेब पाटील देखील उपस्थित होते. (वाचा -मोठी बातमी! मुंबईतील हाफकिन संस्थेला कोरोना लस तयार करण्यास केंद्राकडून परवानगी, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार)
या सभेनंतर पाटील यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागली होती. त्यामुळे त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पाटील यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे बोराळे गावात कोरोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. या गावात आतापर्यंत 40 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. यातील अनेक गावकरी प्रचारसभेला उपस्थित होते.
दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तसेच भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. येत्या 17 एप्रिल ला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे ला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.