Avoid Eating Street Foods: 'उन्हाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा'; मुंबईत अन्नातून विषबाधा झाल्याच्या दोन घटनांनंतर BMC चे नागरिकांना आवाहन

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात असलेल्या स्थानिक दुकानातून प्रथमेश भोकसे या 19 वर्षीय तरुणाचा मंगळवारी सकाळी चिकन शॉरमा खाल्ल्याने मृत्यू झाला, तर पाच जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Street Foods (संग्रहित संपादित प्रतिमा)

Avoid Eating Street Foods: गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत अन्नातून विषबाधेची (Mumbai Food Poisoning) अनेक प्रकरणे समोर आली आहेत. नुकतेच मानखुर्दमध्ये काही रहिवाशांनी सोमवारी सायंकाळी रस्त्यावर तयार केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे 10 ते 12 जणांना विषबाधा झाली व यातील  एका तरुणाचा मृत्यू झाला. शहरात अन्नातून विषबाधा होण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांनंतर बीएमसीने नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

नुकताच चिकन शॉरमा खाल्ल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने बुधवारी एक सूचना जारी केली. मानखुर्दमध्ये ज्या भागात ही रस्त्यावरील अन्नपदार्थांची दुकाने होती त्या भागातील 15 बेकायदा फेरीवालेही महापालिकेने हटवले आहेत.

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात असलेल्या स्थानिक दुकानातून प्रथमेश भोकसे या 19 वर्षीय तरुणाचा मंगळवारी सकाळी चिकन शॉरमा खाल्ल्याने मृत्यू झाला, तर पाच जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशाच एका घटनेत, 26 आणि 27 एप्रिल रोजी गोरेगाव पूर्वेतील रस्त्यावर चिकन शॉरमा खाल्ल्याने किमान 12 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

याबाबत एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले, ‘सहज उपलब्ध असल्याने अनेक लोक हे रस्त्यावरच खाणे पसंत करतात. अनेकदा रस्त्यावरील खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे, शिळे आणि व्यवस्थित साठवलेले नसतात. तसेच उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे अन्न लवकर खराब होते. निकृष्ट अन्नपदार्थांमुळे अन्न विषबाधा सारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात, म्हणून आम्ही नागरिकांसाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी सुचना जारी केली आहे.’ ज्यामध्ये रस्त्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळण्याचे आवाहन केले गेले आहे. (हेही वाचा: Dangerous Buildings in Mumbai: पावसाळ्यापूर्वी मुंबईमधील 188 मोडकळीस आलेल्या इमारती 'धोकादायक' म्हणून घोषित; त्वरीत रिकाम्या करण्याचे नागरिकांना आवाहन)

दरम्यान, बुधवारी एम पूर्व प्रभागाने मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमध्ये रस्त्यावरील खाद्यपदार्थ फेरीवाल्यांवर कारवाई केली. भाजी विक्रेते व फेरीवाल्यांचा माल व इतर साहित्य नागरी पथकाने जप्त केले. मात्र, ही कारवाई केवळ दाखवण्यासाठी असून, फेरीवाल्यांवर कोणतीही ‘कडक कारवाई’ होत नाही, अशी तक्रार स्थानिक रहिवासी विशाल संगारे यांनी केली आहे.