मुंबई: रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात 47 वर्षीय रिक्षा चालकाचा मृत्यू; तीन मुली व बायको असा परिवार उघड्यावर
तर अशा या खड्ड्यांमुळे मुंबईतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्यामुळे, मुंबईतील 47 वर्षीय ऑटो चालकाला (Auto Rickshaw Driver) आपला जीव हमावला लागला आहे.
रस्त्यावरील खड्ड्डे (Pothole) आणि मुंबईचे (Mumbai) नाते हे फार पूर्वीचे आहे. इथे नागरिकांना कधी कधी खड्ड्यांमध्ये रस्ते असल्याचाही भास होते. पावसाळ्यापूर्वीच महानगरपालिकेने (BMC) खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते मात्र ते तडीस काही नेता आले नाही. पालिकेच्या याच कामचुकारपणाची किंमत नागरिकांना मोजावी लागत आहे. तर अशा या खड्ड्यांमुळे मुंबईतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्यामुळे, मुंबईतील 47 वर्षीय ऑटो चालकाला (Auto Rickshaw Driver) आपला जीव हमावला लागला आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.
पंचमलाल निर्मल (Panchamlal Nirmal) असे या व्यक्तीचे नाव असून ते अंधेरी पश्चिम येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार निर्मल अंधेरी पूर्वेकडून वांद्रे पूर्व बाजूने प्रवासी घेऊन जात असताना, शनिवारी ही घटना घडली. वांद्रे येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेशेजारील सर्व्हिस रोडवरून ते जात होते. शनिवारी मुंबईमध्ये पावसाची संततधार चालूच होती. त्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी भरले होते. अशा खड्ड्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात निर्मल यांची ऑटो जोरात जाऊन आदळली.
ऑटोचा पुढचा टायर खड्ड्यात अडकला आणि निर्मल यांचे ऑटोवरील नियंत्रण सुटले. या दरम्यान सुकाणूवरून त्यांचा हातही निसटला व ते ऑटोमधून खाली पडले. हा खड्डा इतका मोठा होता की ऑटो चक्क त्यांच्या अंगावर पडली. स्थानिक लोक आणि पोलिसांनी निर्मल यांना सांताक्रूझमधील व्हीएन देसाई रुग्णालयात नेले. मात्र या अपघातात त्यांच्या हाडांना इजा झाली होती. दुसऱ्या दिवशी निर्मल यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी एडीआर दाखल केला आहे. निर्मल यांच्या पश्चात तीन मुली आणि पत्नी असा परिवार आहे.