शिवजयंतीच्या कार्यक्रमात जेवणाच्या ताटावरून जवानांना हाकलले; विजय कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेंचा निर्णय
सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर यांच्याकडून ही गोष्ट घडली.
शिवाजी महाराज... अवघ्या देशाचे दैवत. आज सर्वत्र महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटाने साजरी होत आहे. मात्र यावेळी महाराजांच्या शिकवणुकीचा पूर्णतः विसर पडलेला दिसून येतो. शिव जयंतीच्या कार्यक्रमावेळी जवानांना भरल्या ताटावरून उठवण्याचा प्रकार आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये घडला. सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर यांच्याकडून ही गोष्ट घडली.
ही गोष्ट समजताच याबाबत चहुबाजूने टीकाही व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर आता जवानांसमवेत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी कायरकर यांच्यावर निलंबनाची (Suspension) कारवाई करुन, त्यांची चौकशी करण्यासंदर्भात त्यांच्या मुळ आस्थापना असलेल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महासंचालकांना कळविण्यात आले आहे.
आज शिवजयंतीच्या निमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील उत्सवात, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी भारतीय लष्कराच्या, गोरखा रेजिमेंटचे जवानही सामील झाले होते. हे जवान सकाळी 6 वाजल्यापासून महाराष्ट्र सदनात बँडच्या माध्यमातून कार्यक्रमात शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचे काम करत होते. दुपारी जेवणासाठी हे जवान कॅन्टीनमध्ये गेले, त्यांना ताटेही वाढली गेली. मात्र त्याचवेळी सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी, जवानांना जेवणाच्या ताटावरुन बाहेर हाकलून लावले. तुमची व्यवस्था दुसरीकडे केली आहे असे या जवानांना सांगण्यात आले.
इतकेच नाही तर हे प्रकरण धक्काबुक्की पर्यंत गेले. गोरखा रेजिमेंटचे जवान कोणत्याही कार्यक्रमाला जात नाहीत, पहिल्यांदाच शिवजयंतीच्या निमित्ताने हे जवान महाराष्ट्र सदनात आले होते. त्यावेळी घडलेला हा प्रकार महाराष्ट्रासाठी अक्षरशः शरमेने मान खाली घालण्यातील प्रकार होता. या घटनेनंतर कायरकर यांच्यावर टीकेची झोड उठली. (हेही वाचा: पुणे: शिवजंयतीच्या उत्सवावर विरजण; हडपसर किल्ल्यावरुन पडून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू)
या प्रकरणाची तातडीने दाखल घेत संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्तांनी तातडीने आदेश काढून, कायरकर यांना सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) पदावरुन कार्यमुक्त केले आहे. तसेच कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाईही केली गेली आहे.