केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना व्यासपीठावर भोवळ; राज्यपालांनी सावरले, उपचार सुरु
दरम्यान, डॉक्टरांचे एक पथक गडकरी यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे समजते.
केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरु असताना व्यसपीठावरच भोवळ आली. भोवळ आल्याने गडकरी यांचा तोल जात होता. मात्र, राज्यपाल सी विद्यासागर राव (Maharashtra Governor C Vidyasagar Rao) यांनी त्यांना सावरले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. गडकरी यांना जवळच्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अहमदनगर (Ahmednagar) येथील राहुरी कृषी विद्यापीठ (Rahuri Agricultural University) पदवीदान समारंभात ही घटना घडली. सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे समजते.
प्राप्त माहितीनुसार, नितीन गडकरी कार्यक्रमासाठी विमानाने शिर्डीला येणार होते. त्यानंतर ते हेलीकॉप्टरने राहुरीला येणार होते. मात्र, अचानक त्यांच्या प्रवासात बदल करण्यात आला. ते थेट राहुरीलाच आले. त्यामुळे राहुरीला आल्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रवास चारचाकी वाहनातून केला. त्यामुळे कदाचीत त्यांची दमछाक झाली असावी असे बोलले जात आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात गडकरी यांनी सुमारे अर्धा तास तडाखेबंद भाषण केले. त्यांच्या भाषणानंतर नियोजीतपणे कार्यक्रम अखेरच्या टप्प्याकडे पोहोचला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होत होती. दरम्यान, राष्ट्रगीत सुरु असतानाच त्यांना भोवळ आली. (हेही वाचा, रस्त्यांची परिस्थिती वाईट असेल तर नितीन गडकरी कंत्राटदारावर बुलडोजर चालवणार)
दरम्यान, या कार्यक्रमासाठी विद्यापिठाचे कुलगुरु, जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, स्थानिक आमदार, पक्षाचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील लोक कार्यक्रमास उपस्थित होते.