विधानसभा निवडणूक 2024: महाविकासआघाडी आणि महायुती सोडवणार का बंडाचे ग्रहण? कुणाला विधानपरिषद, काहींना महामंडळाचे आमिष
दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याद्वारे बंडखोरांशी चर्चा सुरु आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वच पक्षांमध्ये 'इच्छुक झाले फार' अशी अवस्था पाहायला मिळाली. त्यामुळे एका तिकीटावर अनेक दावेदार होते. परिणामी कोणा तरी एकासच तिकीट मिळणे स्वाभाविक होते. असे असताना ज्यांना तिकीट मिळाले नाही त्यांनी पक्षात बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली. बंडखोरीचे हे ग्रहण महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) या दोन्ही विरोधी आघाड्यांतील घटक पक्षांना लागले आहे. त्यामुळे या बंडोबांचे थंडोबा करण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्टवादी काँग्रेस यांच्यासह काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी (SP) प्रयत्न करत आहेत.
मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न
विधासभा निवडणूक 2024 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊन त्याची मुदत संपली देखील. आता केवळ उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत विचार होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आता कुठे महायुती आणि महाविकासआघाडी जागावाटपाच्या चर्चांचे गुऱ्हाळ थांबवून प्रत्यक्ष निवडणुकांना सामोरे जाण्याबाबत विचार करत आहे. सहाजिक अनेक बंडखोरांच्या नाकदुऱ्या काढण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरुन ते राष्ट्रीय पातळीपर्यंतचे नेते बंडोखोरांशी संवाद साधत आहेत. पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी बंडखोरांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी आणि मतांची विभागणी टळली जावी, असा हेतू त्यामागे आहे. (हेही वाचा, Worli Vidhan Sabha Constituency: वरळी मध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरूद्ध शिवसेना Milind Deora यांना उमेदवारी देणार?)
विधानपरिषद महामंडळांचे आमिष
अनेक वरिष्ठ नेत्यांकडून बंडखोरांना विविध पदांचे आमिष दाखवले जात आहे. ज्यामध्ये विधानपरिषद आमदारीकी, महामंडळ आणि इतरही काही जबाबदाऱ्यांचा समावेश आहे. कास करुन अनेकांना राज्यपालनियुक्त 5 रिक्त जागांचेही आमिष दाखवले जात आहे. राज्यपालनियुक्त एकूण 12 पैकी 7 जागा नुकत्याच भरल्या आहेत. तर उर्वरीत पाच जागांसाठी आपला विचार करु असे बंडखोरांना सांगितले जात आहे. त्यामुळे या रदबदलीला यश येते का, याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Eknath Shinde vs Ajit Pawar: एकनाथ शिंदे यांचा अजित पवार यांना धक्का; एबी फॉर्म पाठविण्यासाठी हेलीकॉप्टरचा वापर)
पक्षाचे वरिष्ठ नेते सक्रीय
महाविकासआघाडीमध्ये एका बाजूला शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुले, जयंत पाटील, संजय राऊत, नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे बंडखोरांशी चर्चा करत आहेत. दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याद्वारे बंडखोरांशी चर्चा सुरु आहे. बंडखोरांना थंड करण्यासाठी या सर्वांकडे एकच फॉर्म्युला आहे. तो म्हणजे विधानपरिषद, विविध महामंडळे आणि इतर काही जबाबदाऱ्या.
कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. खास करुन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी बंडखोरांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास 36 बंडखोरांशी व्यक्तिगत पातळीवर फोन करुन संवाद साधला आहे. त्यांंनी अर्ज मागे घ्यावा यासाठी विनंती केली आहे. त्यासाठी त्यांनी नाराज आणि बंडखोरांच्या भावनाही जाणून घेतल्या.