पु. ना. गाडगीळला सायबर चोरीचा फटका; महासिक्युअर अॅपमध्ये प्रवेश करून तब्बल 3 कोटी लंपास
11 ते 13 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही घटना घडली आहे. याबाबत कंपनीचे सीएफओ आदित्य मोडक यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
महाराष्ट्रासह देशातील एक अग्रगण्य सराफ, पु. ना. गाडगीळ अँड सन्स (P N Gadgil & Sons) यांना सायबर चोरीचा (Cyber Theft) फटका बसला आहे. हॅकर्सनी महासिक्युअर अॅपमध्ये प्रवेश करून त्याचा पासवर्ड बदलला आणि त्यानंतर कंपनीच्या अनेक बँकांच्या खात्यामधून कोट्यावधी रुपयांवर डल्ला मारला. मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी सुमारे 2 कोटी 98 लाख 400 रुपये लंपास केले आहेत. 11 ते 13 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही घटना घडली आहे. याबाबत कंपनीचे सीएफओ आदित्य मोडक यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पु. ना. गाडगीळ अँड सन्सची शोरूम भारतासह परदेशातही आहेत. बँकेचे व्यवहार करण्यासाठी कंपनीचे महासिक्युअर अॅप आहे. या अॅपद्वारेच कंपनीतले लोक सर्व बँकिंग व्यवहार करतात. सोमवारी पीएनजीची दुकाने बंद असतात आणि याच गोष्टीचा फायदा चोरट्यांनी घेतला. त्यांनी सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी या महासिक्युअर अॅपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिथे वेगळी 19 खाती जोडली. (हेही वाचा: पुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु)
सुट्टीच्या दिवशी हे घडल्याने ही गोष्ट कोणाच्याही निदर्शनास आली नाही. नवीन खाती जोडल्यावर पीएनजीच्या 12 बँक ऑफ महाराष्ट्रमधील जवळजवळ तीन कोटी रुपये या नव्या खात्यात सरकवण्यात आले. 13 नोव्हेंबरपर्यंत हा प्रकार चालू होता. चोरट्यांनी आधीच अॅपचा पासवर्ड बदलल्याने त्यावर कंपनीच्या कोणाही व्यक्तिला लॉगइन करता येत नव्हते. 13 नोव्हेंबरनंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आदित्य मोडक यांनी पोलिसात धाव घेऊन रीतसर फिर्याद दिली.