Arjun Khotkar Joins Eknath Shinde Camp: अर्जुन खोतकर यांचे एकनाथ शिंदे गटाला समर्थन जाहीर; उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेतल्याचं सांगताना अश्रू अनावर!
शिवसेना नेते Arjun Khotkar यांच्यावर ईडीने काही दिवसांपूर्वी कारवाई करत 78.38 कोटींची मालमत्ता जप्त केली होती.
शिवसेनेचे तडफदार नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी अखेर आज उद्धव ठाकरे यांना रामराम ठोकत शिंदे गटाला समर्थन देत असल्याचा निर्णय जालना मध्ये जाहीर केला आहे. दरम्यान हा निर्णय घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे आणि उपनेते पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे. हा निर्णय ईडीच्या फेर्यातील हतबलतेमधून घेण्यात आल्याचं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर काही दिवसांतच अर्जुन खोतकर यांची शिवसेना उपनेते पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा झाली होती.
जालना मध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी कारखान्याबाबतच्या आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर घरी आल्यावर कुटुंबाचे चेहरे दिसतात आणि त्या दबावामधून काही निर्णय घ्यावे लागत असल्याचं अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. मात्र यावेळी एकाही शिवसैनिकाला आपल्यासोबत येण्याची जबरदस्ती केली नसल्याचं म्हटलं आहे. आता ईडीच्या फेर्यातून सुटण्यासाठी मदत अपेक्षित असल्याचं अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. नक्की वाचा: शिवसेना नेते Arjun Khotkar यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; 78.38 कोटींची मालमत्ता जप्त .
अर्जुन खोतकर 40 वर्ष शिवसेनेसोबत आहेत. 1990 साली त्यांना पहिल्यांदा आमदारकी मिळाली होती. दरम्यान शिवसेना पक्षाच्या आदित्य ठाकरेंच्या नुकत्याच झालेल्या शिवसंवाद यात्रेदरम्यान औरंगाबाद मध्ये अर्जुन खोतकर आणि त्याच्या मुलाने कठीण काळात साथ दिल्याचं पाहून स्टेजवरून आदित्य यांनी त्यांची पाठ थोपटली होती पण नंतर काही दिवसांतच चक्र फिरली. दिल्लीत खोतकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. यावेळेस खोतकरांचे राजकीय शत्रू रावसाहेब दानवे यांच्यासोबत दिलजमाई करून देण्यात आली होती. तेव्हापासूनच खोतकरही शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं चिन्हं दिसायला सुरूवात झाली.