Mumbai Local: धक्कादायक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, धावत्या लोकलमधील लगेज बोगीत मारहाण केल्याने वृद्धाचा मृत्यू

प्रवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बबन हांडे देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

Mumbai Local | ( Photo Credits: Pixabay.com)

Mumbai Local: मुंबई लोकलमधील अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकल (Mumbai Local) मधील लगेज बोगीत मारहाण करून एका वयोवृद्धाची हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. बबन हांडे देशमुख असं या मृत व्यक्तचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

या घटनेनंतर लोकलमधील प्रवाशांच्या जीवाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, लोकलमध्ये चढण्यावरून किंवा बसण्यावरून झालेल्या वादातून वृद्धाची हत्या करण्यात आली असावी. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा -Permanent Judges: मुंबई उच्च न्यायालयाच्या चार अतिरिक्त न्यायाधीशांची स्थायी न्यायाधीश पदी नियुक्ती)

प्राप्त माहतीनुसार, बबन हांडे देशमुख हे सेवानिवृत्त होते. गुरुवारी दुपारी ते काही कामानिमित्त कल्याणला आले होते. त्यांचे काम झाल्यानंतर ते पुन्हा आंबिवलीला घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकातून दुपारच्या सुमारास टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी गाडी पकडली. ते लोकलमधील लगेज बोगीत चढले. यावेळी त्यांचा गाडीत चढण्यावरुन किंवा बसण्यावरुन वाद झाला. या वादातून काही जणांनी त्यांना मारहाण केली. यात बबन हांडे देशमुख यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर टिटवाळा रेल्वे स्थानकात एकच गोंधळ उडाला. मारहाणीत बबन हांडे देशमुख प्रचंड जखमी झाले होते. प्रवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बबन हांडे देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.