राज्य शासनाच्या रोजगारासंबंधी योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत आधार कार्ड ऑनलाइन लिंक करण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करावे

Aadhar Card (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) रोजगारासंबंधी योजनांचा (Employment Schemes) लाभ घेण्यासाठी आधार कार्ड लिंक (Aadhar Card) करणे गरजेचे आहे. राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त छाया कुबल यांनी केले आहे. आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2020 पर्यंत आहे.

नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पद्धतीने वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्यांची सर्व माहिती मिळवणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळवणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता अद्यावत करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचित केलेली रिक्तपदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे. (हेही वाचा: लॉकडाऊन दरम्यान विजेचे अतिरिक्त बिल आलेल्या ग्राहकांना दिलासा; महाराष्ट्र सरकार भरणार 1 कोटी ग्राहकांचे ज्यादाचे बिल)

उद्योजकांच्या मागणीनुसार उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीस आधार लिंक असणे आवश्यक आहे. अनेक बाबींचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने नोंदणीस आधार कार्ड जोडणी करणे गरजेचे आहे. नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांनी आधार कार्ड लिंक करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मुंबई शहर), 175, श्रेयस चेंबर्स, पहिला मजला, डीएन रोड, सीएसएमटी, फोर्ट, मुंबई- 400001 या पत्यावर अथवा ईमेल asstdiremp.mumcity@ese.maharashtra.gov.in अथवा दूरध्वनी क्रमांक 022–22626303 वर संपर्क साधावा.