Antilia Bomb Scare Case: परमबीर सिंह हेच अँटिलीया प्रकरणाचे मास्टरमाईंड; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जबाब
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरुच आहेत. अंटीलिया प्रकरणाचे मास्टरमाईंड सचिन वाझे (Sachin Vaze) हेच आहेत, अशी माहिती आपल्याला मिळाली होती.
अँटीलिया स्फोटक(Antilina Case) प्रकरणी तपास सुरु आहे. दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरुच आहेत. अंटीलिया प्रकरणाचे मास्टरमाईंड सचिन वाझे (Sachin Vaze) हेच आहेत, अशी माहिती आपल्याला मिळाली होती. त्यामुळेच त्यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटविण्यात आले, असा जबाब अनिल देशमुख यांनी दिला आहे. अनिल देशमुख यांनी ईडिसमोर (Enforcement Directorate) हा जबाब दिल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात परमबीर सिंह हे आपली दिशाभूल करत होते. या प्रकरणात त्यांचे सहकारी सचिन वाझे गुंतले होते त्यामुळे ते असे करत होते, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांना 17 मार्च 2021 रोजी हटविण्यात आले. त्यानंतर 20 मार्च 2021 रोजी त्यांनी आपल्यावर आरोप केले, असे अनिल देशमुख यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. अँटीलीया प्रकरणात सचिन वाझे आणि त्यांचे चार निकटवर्तीय यांची नावे पुढे आल्याने त्यांना आयुक्त पदावरुन हटविण्यात आल्याचेही अनिल देशमुख यांनी ईडीला सांगितल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, Antilia Case: 'सचिन वाझे यांना तुरुंगात विवस्त्र करून शिवीगाळ'; माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा आरोप)
दरम्यान, सचिन वाझे याच्यावरुन परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत. अँटीलीया स्फोटक प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप करुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. सचिन वाझे यांना तुरुंगात विवस्त्र केले जात असून त्यांना शिवीगाळही केली जात असल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. शिवाय त्यांच्यावर दबावही टाकला जात असल्याचा परमबीर सिंह यांचा दावा आहे. निलंबीत असलेले सचिन वाझे यांची मुंबई पोलीस दलात पुन्हा नियुक्त करण्यासाठी आपल्यावर दबाव होता, असा जबाब परमबीर सिंह यांनी ईडीला काल दिला होता. त्यानंतर त्यांनी आजही आरोप करुन खळबळ उडवून दिली आहे.