Antarwali Sarathi Lathicharge: जालन्याच्या अंतरवली सराटी मधील लाठीचार्ज Devendra Fadnavis यांच्या आदेशाने नाही - RTI मध्ये माहिती
त्यांनी आता सरकारला डिसेंबर महिन्यापर्यंत आरक्षण द्यावं यासाठी अल्टिमेटम दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या अंतरवली सराटी ((Antarwali Sarathi Lathicharge) मध्ये आंदोलकांवर ऑगस्ट महिन्यात लाठीचार्ज झाला होता. या लाठीचार्ज नंतर राज्यात वातावरण पेटलं होतं. अनेकांनी संताप व्यक्त केला होता. आता या लाठीचार्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी माहितीच्या अधिकार्यात दिलेल्या उत्तरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या लाठीचार्जचे आदेश दिले नसल्याचं ते म्हणाले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कुणाचे होते? याबाबत माहिती मागवली होती. त्यावर उत्तर देताना जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश नाहीत असं म्हटलं आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी इथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. या उपोषणस्थळी 23 ऑगस्टला पोलिसांकडून लाठीचार्ज झाला होता. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर दगडफेकही झाली होती. यामध्ये अनेक महिला देखील जखमी झाल्या होत्या.
जालना च्या मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे आदेश कुणाचे होते असा प्रश्न सरकारला विरोधकांनीही केला आहे. त्यावेळी घडल्या प्रकरणी फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली होती. नक्की वाचा: Ajit Pawar On Jalna Lathi Charge: सरकारने जालना मध्ये लाठीचार्जचे आदेश दिल्याचं सिद्ध केल्यास राजकारणापासून दूर होईन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विरोधकांना आव्हान.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता सरकारला डिसेंबर महिन्यापर्यंत आरक्षण द्यावं यासाठी अल्टिमेटम दिला आहे. सध्या ते राज्यात विविध ठिकाणी सभा घेत मराठा आंदोलकांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.