Anocovax Vaccine for Animals: भारतात लाँच झाली प्राण्यांसाठी कोरोना विषाणू लस 'अ‍ॅनोकोव्हॅक्स'; Delta आणि Omicron पासूनही मिळणार संरक्षण

ही लस कुत्री, सिंह, बिबट्या, उंदीर आणि ससे यांच्यासाठी सुरक्षित आहे.

COVID-19 Vaccination | (Photo Credit: Twitter/ANI)

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गुरुवारी प्राण्यांसाठी विकसित केलेली देशातील पहिली अँटी-कोविड लस 'अ‍ॅनोकोव्हॅक्स' (Anokovax) सादर केली. ही लस हरियाणास्थित आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्सने (NRC) ने विकसित केली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की, अ‍ॅनोकोव्हॅक्स ही प्राण्यांसाठी सार्स-कोव्ह-2 डेल्टा (SARS-CoV-2 Delta) लस आहे. सार्स कोव्हच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही प्रकारांपासून संरक्षण करण्याची क्षमता या लसीमध्ये आहे.

या लसीमध्ये निष्क्रिय सार्स कोव्ह 2 (डेल्टा) अँटिजेन आणि अलहायड्रोजेलचा (Alhydrogel) समावेश आहे. ही लस कुत्री, सिंह, बिबट्या, उंदीर आणि ससे यांच्यासाठी सुरक्षित आहे. डिजिटल माध्यमातून ICAR-NRC द्वारे प्राण्यांसाठी विकसित केलेली लस आणि निदान किट जारी केल्यानंतर तोमर म्हणाले, 'वैज्ञानिकांच्या अथक योगदानामुळे देश लसी आयात करण्याऐवजी स्वत:च्या लसी विकसित करण्यात स्वयंपूर्ण झाला आहे.' आयसीएआर ही देशातील प्रमुख कृषी संशोधन संस्था आहे, जी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.

दरम्यान, याआधी रशियाने कोरोना विषाणूविरूद्ध प्राण्यांसाठी जगातील पहिली लस सादर केली होती. रॉयटर्सच्या अहवालानुसार, कृषी नियामक रोसेलखोझनादझोर यांनी सांगितले की, लसीकरणानंतर प्राण्यांमध्ये सह महिन्यासाठी प्रतिकारशक्ती टिकते. रशियन शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की या लसीचा वापर व्हायरसमधील बदल थांबवू शकतो. (हेही वाचा: WHO मुख्य शास्त्रज्ञांचे विधान, देशात मिनी कोरोना लाटेची भीती)

कृषी नियामकाच्या उपप्रमुखांनी सांगितले होते की, प्राण्यांसाठी ही लस रोसेलखोझनाडझोरच्या युनिटने विकसित केली आहे आणि तिला कार्निव्हॅक-कोव्ह असे नाव देण्यात आले आहे. या कोविड-19 लसीची बीव्हर, कोल्हा, मांजर आणि कुत्र्यावर चाचणी करून अशा प्राण्यांमध्ये विषाणूविरूद्ध प्रतिपिंड तयार झाल्याचे दिसून आले होते.