Anil Deshmukh On Police Recruitment: 12,500 कर्मचार्यांच्या भरतीसह महाराष्ट्र पोलीस दलाची ताकद वाढणार, 25-30 लाख उमेदवारी अर्जांची अपेक्षा- अनिल देशमुख
Anil Deshmukh On Police Recruitment: महाराष्ट्र सरकारने राज्यातील पोलीस दलात 12,500 कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस दलातील रिक्त पदांसाठी भरती करण्यात यावी असा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संमती दिली होती. तर राज्यात होणाऱ्या पोलीस दलातील मेगाभरतीमुळे तरुणांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे. याच पार्श्वभुमीवर आज अनिल देशमुख यांनी पुण्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या येथे बोलताना म्हटले आहे की, 12,500 कर्मचाऱ्यांची भरती केल्यास महाराष्ट्रातील पोलीस दलाची ताकद वाढणार आहे. त्याचसोबत 25-30 लाखांपर्यंतच्या अर्जांची अपेक्षा अनिल देशमुख यांनी केली आहे.( पोलीस भरतीमध्ये नवे नियम)
पोलीस भरतीमध्ये राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळण्याच्या अनुषंगाने त्यांची तयारी करुन घेण्यात येणार आहे. यासाठी त्यांना सामान्य ज्ञान आणि शारीरिक चाचण्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सध्या वर्धा, गडचिरोली, अमरावती, नांदेड, जालना, पुणे, यवतमाळ, परभणी, सोलापूर, औरंगाबाद, बुलडाणा, नाशिक, बीड आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले होते.(Maharashtra Police Bharti 2020: पोलीस दलात मेगाभरतीची संधी)
पोलीस भरतीची ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच पोलीस खात्यातील प्रस्तावित भरतीबाबत मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने 13.5 टक्के जागा राखून ठेवून इतर भरती करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्यात येत असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.