Andheri East Bypoll 2022: ऋतुजा लटके यांच्या राजीनामा अर्जावर बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल काय म्हणाले? घ्या जाणून
दबावाचा प्रश्नच येत नाही. ऋतुजा लटके यांनी 30 ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला होता. सध्या त्यांचा राजीनामा स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रक्रिया सुरु आहे. आणि नियमानुसार राजीनामा स्वीकारण्यास 30 दिवसांचा कालावधी लागतो.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक सध्या जोरदार चर्चेत आहे. प्रामुख्याने विरोधी पक्षांनी एकमेकांवर केलेल्या आरोपापेक्षा ही निवडणूक एकाच पक्षातील दोन गटांमुळे आणि उमेदवारावरुन अधिक चर्चेत आली आहे. निमित्त ठरले आहे मुंबई महापालिका कर्मचारी ऋतुजा लटके यांचा राजीनामा. ऋतुजा लटके (Rutuja Latke) या दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. पतीच्या निधनानंतर रिक्त जागेवर त्या उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून निवडणूक लढवू इच्छित आहेत. दरम्यान, त्यासाठी आवश्यक असलेल्या बीएमसीतील नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, हा राजीनामा बीएमसी स्वीकारत नसल्याचा त्याचा आरोप आहे. प्रकरणही न्यायालयात पोहोचले आहे. या आरोपावर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इक्बाल सिंह चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, मुंबई महापालिका प्रशासन अथवा माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. दबावाचा प्रश्नच येत नाही. ऋतुजा लटके यांनी 30 ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला होता. सध्या त्यांचा राजीनामा स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रक्रिया सुरु आहे. आणि नियमानुसार राजीनामा स्वीकारण्यास 30 दिवसांचा कालावधी लागतो. कायद्याला अनुसरुन जी प्रक्रिया आहे ती पार पाडावी लागते, असेही चहल म्हणाले. इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे 30 दिवस म्हणजे 3 नोव्हेंबरपर्यंत राजीनाम्याची प्रक्रिया सुरू असणार आहे. (हेही वाचा, Rutuja Latke BMC Resignation: बीएमसी राजीनामा स्वीराकरत नाही, ऋतुजा लटके यांचा दावा; मुंबई उच्च न्यायालयात उद्या सुनावणी)
ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे अवघे दोनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे इक्बाल सिंह चहल यांचे वक्तव्य सूचक मानले जात आहे. कारण, आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार हा राजीनामा मंजूर करण्यास जर 30 दिवस म्हणजेच एक महिना लागणार असेल तर, तोवर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत उलटून जाणार आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांना उमेदवारी भरण्याची संधी मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. तसे घडले तर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
ट्विट
ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरुन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर मोठाच पेच निर्माण झाला आहे. ज्या व्यक्तीला उमेदवारी दाखल करायची असते त्या व्यक्तीला कोणत्याही सरकारी सेवेत महत्त्वाच्या पदावर सक्रीय राहता येत नाही. त्यामुळे सदर व्यक्तीने पदाचा राजीनामा द्यावा ही अपेक्षा असते. परंतू, राजीनामा देऊन महिना उलटला तरी त्यावर कोणताही निर्णय पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला नाही. दुसऱ्या बाजूला त्यांनी (लटके) सुधारीत राजीनामा पाठवला तरीही त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. परिणामी लटके यांनी न्यायालयात दाद मागितली.