अमरावती: ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने 16 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

झी 24 तासने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेने त्याच्या मातापित्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या परिसरात शोककळा पसरली आहे.

Suicide (Photo Credits: Pixabay, Open Clip Art)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊन (Lockdown) मुळे देशभरातील सर्व शाळा, महाविद्यालये, क्लासेस बंद असून ऑनलाईन पद्धतीने (Online Classes) शिक्षण देण्याचे काम सुरु आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी हा उपक्रम सरकारकडून राबविण्यात आला आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणासाठी घरच्या परिस्थितीमुळे मोबाईल नसल्याने अमरावतीत (Amravati)  एका 16 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झी 24 तासने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेने त्याच्या मातापित्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या परिसरात शोककळा पसरली आहे.

झी 24 तासने दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत नरेंद्र वानखडे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो अमरावतीतील मोर्शी तालुक्यातील सावरखेड या गावात राहतो. नुकताच दहावीत उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने अकरावीसाठी निंभी येथील महाविद्यालय प्रवेश घेतला होता. कोरोना व्हायरसमुळे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. अशा परिस्थितीत आपल्या घरच्या गरिबीमुळे मोबाईल नसल्याने अनिकेतला ऑनलाईन शिक्षण घेता येत नव्हते. म्हणून त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.  Online Classes From Tree Top: नंदुरबारच्या शिक्षकाची चिकाटी; जमिनीवर मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने चक्क झाडावर चढून मुलांना शिक्षण (See Photo)

या प्रकरणाची पोलिस चौकशी करत असून अधिक तपास सुरु आहे. अनिकेतचे वडिल सामान्य शेतकरी आहेत. त्यांचे शेतीपिकात नुकसान झाल्याने हे नुकसान भरून काढण्यासाठी घरात होता नव्हता तो पैसा त्यात निघून गेला. त्यामुळे ते अनिकेतला मोबाईल देऊ शकले नाही. मात्र यामुळे त्याचे ऑनलाईन शिक्षण होत नव्हते. यामुळे आलेल्या नैराश्यापोटी त्याने ही आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

ऑनलाईन शिक्षण न मिळत असल्याने विदयार्थी नैराश्यात जात असून दुसरीकडे ऑनलाईन क्लासची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना क्लास न बसविण्याच प्रकारही काही ठिकाणी सुरु आहे. पनवेलच्या DPS शाळेत फी न भरल्याने विद्यार्थ्याला ऑनलाईन क्लासला न बसण्याचा प्रकार घडला होता.