अमरावती येथे 13 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण, आकडा 56 वर पोहचला
महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे हे रेड झोनमध्ये असून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे हे रेड झोनमध्ये असून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तर कोरोनबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी अहोरात्र उपचार करत आहेत. तरीही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तसेच कोरोनावर अद्याप ठोस औषध उपलब्ध झालेले नाही. याच दरम्यान आता अमरावती मधील एका 13 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रीन आणि ऑरेंज झोनना काहीसा दिलासा दिला आहे. परंतु रेड आणि कंन्टेंटमेंट झोन येथे नियमांचे पालन करण्यास नागरिकांना सांगण्यात आले आहे. पोलिसांकडून रस्त्यावर गस्त घालण्यात येत आहे. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता तरी जबाबदार नागरिकासारखे वागावे अशी अपेक्षा केली जात आहे. (वाशिम जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या ट्रक चालकाचा आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह)
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. येत्या 17 मे पर्यंत केंद्र सरकारने लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. मात्र राज्य सरकारने जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पोहचवणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच आता विविध राज्यात अडकलेले मजूर आणि कामगारांना आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने स्पेशल ट्रेन आणि बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.