Amol Kolhe Pending E-Challans: अमोल कोल्हे यांची वाहतूक पोलिसांवर टीका; MTP ने प्रत्यूत्तर देत उघड केली अभिनेत्याच्या वाहनावरील 16,900 किमतीची प्रलंबित ई-चालानची थकबाकी
कोल्हे यांच्या ट्विटला प्रतिसाद म्हणून मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या वाहनाची एकूण 15 ई-चालानची थकबाकी एकूण 16,900 रुपये आहे.
Amol Kolhe Pending E-Challans: लोकप्रिय मराठी अभिनेते आणि राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी ट्विटरवर वाहतूक पोलिसांवर (Mumbai Traffic Police) प्रश्न उपस्थित करून सध्याच्या राज्य सरकारवर टीका केली. अमोल कोल्हे यांनी वाहतूक पोलिसांचा उल्लेख 'ट्रिपल-इंजिन सरकार, तिहेरी रिकव्हरी' असा करत मुंबई वाहतूक पोलिसांना वाहतूक दंड वसूल करण्याच्या दृष्टीकोनातून लक्ष्य केले. कोल्हे यांच्या ट्विटला प्रतिसाद म्हणून मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या वाहनाची एकूण 15 ई-चालानची थकबाकी एकूण 16,900 रुपये आहे.
आपल्या ट्विटमध्ये कोल्हे यांनी वाहतूक पोलिस आणि सरकारवर टीका करताना म्हटलं आहे की, 'मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात 25000 रूपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे!मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये.. इतर शहरांचं काय? संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का याची जनतेला माहिती मिळेल! ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली???' (हेही वाचा -Amol Kolhe: खासदार अमोल कोल्हे यांची दिशा पावले कोणत्या दिशेला? इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना गती)
वाहतूक पोलिसांनी दिलं अमोल कोल्हेंना उत्तर -
काही तासांनंतर, एमटीपीने कोल्हे यांच्या ट्विटर उत्तर दिले की, 'त्यांच्या वाहनाची 2019 ते 2023 या कालावधीत मुंबई, सातारा, नवी मुंबई आणि महामार्ग पोलिसांच्या कार्यक्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रात 15 प्रलंबित ई-चलान आहेत. बहुतांश उल्लंघने ओव्हरस्पीडिंग आणि जंपिंग सिग्नलशी संबंधित आहेत, कोल्हे यांनी 16,900 रुपये देणे बाकी आहे. यापैकी 12 ई-चालान तुमच्या वाहनासाठी विहित वेगमर्यादा न पाळल्याबद्दल आहेत. याबाबत तुमच्या मोबाईल क्रमांकावर अनेक संदेश पाठवण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला तुमची थकबाकी भरण्याची विनंती करतो.' (हेही वाचा - Amol Kolhe On Free Pass: मोफत तिकीट मागणाऱ्यांना अमोल कोल्हेंची कळकळीची विनंती, महानाट्या नंतर व्हिडिओ शेअर करत केली ही मागणी)
तथापी, वाहतूक पोलिसांनी पुढे म्हटलं आहे की, 'ही दंडनीय रक्कम शासनजमा करण्यासाठी व वाहतुकीच्या नियंमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमधे वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी शनिवार व रविवार या दिवशी दंड वसुलीची मोहिम हाती घेण्यात येते. अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणारा संदेश समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यापूर्वी आपण जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याने पर्यवेक्षिय अधिकाऱ्यांकडुन वस्तुस्थितीची माहिती घेऊन आपण संदेश प्रसारित करणे अपेक्षित होते.'
दरम्यान, MTP ने 2019 पासून आत्तापर्यंत मुंबई अधिकारक्षेत्रात जारी केलेल्या ई-चलानचा ताजा डेटा शेअर केला. 2019 मध्ये, ₹59,70,97,225 भरपाई शुल्कासह 18 लाखांहून अधिक ई-चलान जारी करण्यात आले. 2021 मध्ये, एकूण ₹1,12,92,68,753 दंडाच्या रकमेसह 37 लाख ई-चलान जारी करण्यात आले. त्याचप्रमाणे, 2022 मध्ये, 1,59,47,65,201 रुपयांच्या दंड रकमेसह 33 लाख ई-चलान जारी करण्यात आले. नोव्हेंबर 2023 पर्यंत, एकूण 2,05,83,76,500 रु किमतीची 36 लाख ई-चलान जारी करण्यात आली आहेत.
वाहतूक पोलिस अधिकार्यांनी सांगितले, 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणार्यांकडून 205 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे, जो 2022 मध्ये वसूल करण्यात आलेल्या दंडापेक्षा 46 कोटी अधिक आहे. नागरिकांनी सुरक्षित प्रवासासाठी वाहतूकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.