दिल्ली पाठोपाठ मुंबई मध्ये कॉंग्रेस पक्षाची लस तुटवड्यावरून पोस्टरबाजी; 'मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया? चा विचारला सवाल
काही दिवसांपूर्वी जेव्हा दिल्लीत अशाप्रकारे पोस्टरबाजी करण्यात आली होती तेव्हा पोलिसांनी या पोस्टरबाजीतून 9 जणांना ताब्यात घेत कारवाई केली होती.
महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या डोसच्या तुटवड्यामुळे एकूणच लसीकरण कार्यक्रमाचा वेग मंदावला आहे. राज्य सरकार सध्या 18-44 वयोगटातील लसीकरण थांबवून त्यांच्या लसी 45 वर्षांवरील नागरिकांच्या दुसर्या डोस साठी वापरत आहे. त्यामुळे आता देशात लसीकरणावरूनही राजकारण सुरू झाले आहे. कॉंग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) याचवरून प्रश्न विचारत पोस्टरबाजी केली आहे. दिल्ली पाठोपाठ आज मुंबई मध्येही 'मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?' असा सवाल विचारणारे फलक झळकताना दिसले आहेत. दरम्यान मीडीया रिपोर्ट्स नुसार मुंबईत घाटकोपर भागात हे पोस्टर्स झळकले असून त्यावर मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप, मा.आमदार चरणसिंग सप्रा, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अब्राहम रॉय मणी आणि ब्रिजेश रवि भाटला यांची नावं दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी जेव्हा दिल्लीत अशाप्रकारे पोस्टरबाजी करण्यात आली होती तेव्हा पोलिसांनी या पोस्टरबाजीतून 9 जणांना ताब्यात घेत कारवाई केली होती. आता मुंबईमध्ये या पोस्टरबाजीचे नेमके काय परिणाम दिसणार? हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोशल मीडीयामध्येही 'मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?' च्या पोस्ट शेअर केल्या आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी देखील सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्वीटर च्या माध्यामातून टीकास्त्र डागत त्यांच्या कोविड 19 बाबतच्या धोरणांवर बोट ठेवत असताना दिसले आहेत. केंद्र सरकारने मागील काही महिन्यांत देशात तयार झालेल्या कोवॅक्सिन, कोविशिल्डचे डोस परदेशात मदत म्हणून पाठवले आहेत. आणि आता भारतात लसींचा तुटवडा आणि कोरोनाच्या दुसर्या लाटेचं थैमान सुरू असताना कॉंग्रेस कडून त्यांच्या याच गोष्टीचा जबाब विचारला जात आहे. नक्की वाचा: Rahul Gandhi यांचे आव्हान, म्हणाले- 'मलाही अटक करा'; PM Narendra Modi यांच्यावर टीका करणाऱ्या पोस्टरबाबत राजकीय वाद.
मुंबईतील पोस्टरबाजीचे फोटोज
मुंबई मध्ये कॉंग्रेस आणि बीएमसी असा देखील वाद मागील काही दिवसांमध्ये दिसला आहे. कॉंग्रेसचे तरूण आमदार झिशान सिद्दीकी यांनी मागील काही दिवसांत मुंबई महापालिकेच्या कामावर, वॉर्ड ऑफिसरच्या कामावर तसेच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या लुडबुडीं विरोधात आवाज उठवताना दिसले आहेत.
मुंबई मध्ये सध्या लसीकरण केंद्र वाढवण्याची कामं सुरू आहेत पण पुरेसे डोस उपलब्ध नसल्याने आता मर्यादित संख्येमध्ये लसींचे डोस उपलब्ध करत 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. तर 18-44 या वयोगटातील लसीकरण पुढील आदेशापर्यंत थांबवले आहे.