Coronavirus: राज्यातील नागरिकांनी अनधिकृत मार्गाचा वापर करून प्रवास करू नका; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मांडले 'हे' महत्वाचे मुद्दे
कोरोना विषाणूने (Coronavirus) जगभरात थैमान घातला आहे. कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्यामुळे प्रत्येकासमोर कोरोना विषाणूचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून (State Government) युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्राचे (Maharashtra)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोरोना विरोधात लढाई जिंकण्यासाठी आतापर्यंत अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. यातच मुख्यमंत्री फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयावर भाष्य केले. मात्र, महाराष्ट्रात काही ठिकाणी अडकलेले काही जण ट्रक आणि टॅंकरमधून प्रवास करत आहेत. अशा नागरिकांची व्यवस्था केली जात असून कोणीही अनधिकृत मार्गाचा वापर करून प्रवास करुन नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी देशात 21 दिवसांकरिता संचारबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर काहीजण ट्रकच्या मागे लटकून प्रवास करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरस झाला आहे. याच गोष्टीवरून मला धक्काच बसला असे सांगत उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. याशिवाय कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जिथे आहात, तिथेच राहणे महत्वाचे आहे. तसेच पुढील 15-20 दिवस राज्यातील लोकांसाठी कसोटीचे आहेत, असेही ते म्हणाले आहेत. याशिवाय अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा केली आहे. हे देखील वाचा- Lockdown: संचारबंदीच्या काळात इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मद्यविक्री; विरार येथील एका बार मालकाला अटक
व्हिडिओ-
शिवभोजन थाळीसंख्या वाढवली-
राज्यभरातील शिवभोजन केंद्रे तीन तास सुरू ठेवण्यात येत आहेत. या संकटात राज्यभरातून शिवभोजन केंद्रांनी गरजू आणि भुकेल्या लोकांची भूक भागवावी, हा हेतु आहे. त्यांचे उद्दिष्ट्यही आम्ही 1 लाखांपर्यंत वाढवत आहोत. त्याचा लाभ गरजूंनी घ्यावा मात्र त्यासाठी गर्दी करून आरोग्याला धोका होईल असे वागू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यासाठी पुढील 15-20 दिवस कसोटीचे-
महाराष्ट्र करोना साथीच्या महत्त्वाच्या टप्प्यात सध्या आला आहे. राज्यासाठी पुढील 15-20 दिवस आपल्या सर्वांसाठीच परीक्षेचे आणि कसोटीचे आहेत. दरम्यान, कोणत्याही नागरिकांनी डगमगून जाऊ नका. या संकटाला धैर्याने सामोरे जा. सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करा. कृपा करून घराबाहेर पडू नका. रस्त्यावर गर्दी करू नका, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले.
खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत-
खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाव्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे इतर रोगांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात त्यांची गैरसोय होऊ नये. लवकरच आपण अत्यावश्यक सेवेतील सर्वांना ओळखपत्र देत आहोत त्यात डॉक्टर, त्यांच्याकडील कर्मचारी सर्वांचा समावेश असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 लाखांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती आकडेवारी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत एकूण 810 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. यात 19 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, त्यापैंकी 67 नागरिक बरे झाल्याचेही सांगितले जात आहे.