Raigad Ambenali Ghat News: आंबेनळी घाटात दरड कोसळली; महाबळेश्वरहून पोलादपूरकडे जाणारी वाहतूक ठप्प
सततच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे त्यामुळे घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी सावध राहावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. अशातच रायगडमधून (Raigad) एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगड हद्दीतील आंबेनळी घाटात (Ambenali Ghat) मंगळवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. आंबेनळी घाटात चिरेखिंडी येथे ही दरड कोसळल्याने महाबळेश्वरहून पोलादपूरकडे (Mahabaleshwar to Poladpur) आणि पोलादपूर होऊन महाबळेश्वरकडे (Poladpur to Mahabaleshwar ) जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. (हेही वाचा - Maharashtra Rain Update: राज्यात मुसळधार तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज)
आंबेनळी घाटातून प्रवास न करण्याचे पोलादपूर तहसीलदारांनी आवाहन केले आहे. सततच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली होती. आता मंगळवारी रात्रीच्या सुमारास रायगडच्या आंबेनळी घाटात चिरेखिंडी येथे ही दरड कोसळल्याने महाबळेश्वरहून पोलादपूरकडे आणि पोलादपूर होऊन महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज सकाळपासून दरड हटवण्याचे काम सुरू होणार आहे.
पुढील चार ते पाच दिवसांत कोकणासह रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने घाटमाथ्यावर वाहनचालकांनी सतर्कतेने प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.