महाराष्ट्र: 2019 मध्ये कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला अलमट्टी धरण कारणीभूत नसल्याचे समितीकडून स्पष्टीकरण

मात्र पूरपरिस्थितीचे कारण अलमट्टी धरण नसल्याचे महाराष्ट्र सरकारच्या एका समितीने स्पष्ट केले आहे.

Flood (Photo Credits: Twitter)

गेल्या वर्षी 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur) या जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला कर्नाटक (Karnatak) मधील अलमट्टी धरण (Almatti Dam) कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पूरपरिस्थितीचे कारण अलमट्टी धरण नसल्याचे महाराष्ट्र सरकारच्या एका समितीने स्पष्ट केले आहे. समितीच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली.

अलिकडेच राज्य सरकारला रिपोर्ट करणारी वाडनेरे समितीने पूर प्रतिबंधासाठी विशेष समिती स्थापन करण्याची शिफारस केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या जल संधारण विभागाच्या अधिकाऱ्यांचा या समितीमध्ये समावेश करावा असा सल्ला दिला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षी उद्भवलेली पूरपरिस्थिती लक्षात घेता ही समिती स्थापन करण्यात आली आहे. गेल्यावर्षी झालेले नुकसान यंदा टाळता यावे या दृष्टीकोनातून खबरदारी घेतली जात आहे. (सांगली-कोल्हापूर महापूर पूनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला सूचना; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा)

राज्याच्या जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीने कोल्हापूर आणि सांगलीमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीला सांगलीच्या जवळ असलेले आणि कर्नाटकच्या सीमेवरील अलमट्टी धरण कारणीभूत नसल्याचे स्पष्ट केले. साताऱ्यामधील कराड, सांगली आणि कोल्हापूर येथे कमी अंतरावर अनेक नद्यांचा संगम असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून पूर आला असे आता समितीकडून सांगण्यात येत आहे. परंतु, गेल्या वर्षी सांगली, कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला कर्नाटक सरकार जबाबदार असल्याचे म्हटले जात होते. कारण अतिवृष्टीनंतरही कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाचे दरवाजे त्यांनी उघडले नव्हते.