Allegations on Sameer Wankhede: 'मंत्री Nawab Malik यांच्याविरुद्ध FIR दाखल, आम्ही कायदेशीर कारवाई करणार'- Kranti Redkar
ही केवळ औपचारिकता होती. नवाब मलिक यांनी सादर केलेले जन्म प्रमाणपत्र चुकीचे आहे. आमचे वैयक्तिक फोटो शेअर करून नवाब मलिक हे त्यांनी घेतलेल्या संवैधानिक शपथेविरुद्ध काम करत आहेत
बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणाची (Aryan Khan Drug Case) चौकशी करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या चर्चेत आहेत. समीर वानखेडे हे त्यांची कणखर भूमिका आणि गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईसाठी ओळखले जातात. मात्र शाहरुखचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गेले काही दिवस मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत आहेत. आता समीर वानखेडे हे मुस्लीम आहेत की नाही यावरुन वाद सुरु आहे.
मलिक यांनी आरोप केला आहे की, समीर वानखेडे हे मुस्लीम असून ते बनावट कास्ट सर्टिफिकेट मिळवून आयआरएस अधिकारी झाले. अशाप्रकारे त्यांनी एका दलिताचा हक्क हिरावून घेतला. नवाब मलिक यांचे वारंवार होत असलेले हल्ले पाहता आता समीर वानखेडे यांची पत्नी म्हणजेच अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) त्यांच्या मदतीला धावली आहे. ‘माझा नवरा खोटा नसून तो एक प्रामाणिक माणूस आहे’, असे तिने मंगळवारी सांगितले. क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेत आपले म्हणणे मांडले.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री मलिक यांनी बुधवारी समीर वानखेडे यांचा निकाहनामा प्रसिद्ध केला आणि ते मुस्लीम असल्याचा मोठा आरोप केला. आपला हा आरोप चुकीचा असल्याचे सिद्ध झाल्यास आपण राजकारण सोडेन, असे आव्हान त्यांनी दिले होते. यावर आता याबाबत क्रांतीचे उत्तर समोर आले आहे. समीर वानखेडे यांचा पहिल्या पत्नीसोबत विवाह झाला होता आणि हे लग्न खरे आहे, मात्र समीर वानखेडे यांनी धर्म किंवा जात बदलली नसल्याचे क्रांतीने सांगितले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ती म्हणाली. (हेही वाचा: नवाब मलिक यांच्या आरोपांवर अभिनेत्री Kranti Redkar कडून पतीची पाठराखण, म्हणाली- 'मी आणि माझा नवरा समीर वानखेडे जन्मतः हिंदू आहोत')
क्रांती म्हणाली, ‘माझी सासू मुस्लिम असल्याने फक्त तिच्या आनंदासाठी हा ‘निकाह’ झाला होता. ही केवळ औपचारिकता होती. नवाब मलिक यांनी सादर केलेले जन्म प्रमाणपत्र चुकीचे आहे. आमचे वैयक्तिक फोटो शेअर करून नवाब मलिक हे त्यांनी घेतलेल्या संवैधानिक शपथेविरुद्ध काम करत आहेत. आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू. याबाबत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मलिक यांचा एकच हेतू आहे तो म्हणजे समीर वानखेडे यांना पदावरून हटवणे, जेणेकरून त्यांच्या जावयाला वाचवता येईल.’