KDMC: कल्याण-डोंबिवलीतील सर्व दुकाने शनिवारी-रविवारी राहणार बंद; केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत.
महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. यातच कोरोनाचा वाढता धोका पाहता कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेने (Kalyan-Dombivli Municipal Corporation) मोठा निर्णय घेतला आहे. कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दर शनिवार आणि रविवारी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता शनिवारी-रविवारी सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
कल्याण डोंबिवलीत अत्यावश्यक सेवा, औषधी दुकाने व वैद्यकीय सेवा, किराणा, दूध व वृत्तपत्रे, पेट्रोलपंप वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. तसेच फेरीवाले, हातगाडी विक्रेते यांना मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय, भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याचे आदेश आहेत. याचबरोबर हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, पोळीभाजी केंद्र इत्यादी ठिकाणी पार्सल सुविधा सुरू राहणार आहेत. हे देखील वाचा- Nashik: 'निर्बंध पाळा अन्यथा लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही' छगन भुजबळ यांचा नाशिककरांना इशारा
ट्विट-
महाराष्ट्रात आज 36 हजार 902 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 17 हजार 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 23 लाख 56 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2 लाख 82 हजार 451 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.2%झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.