Alibag Parasailing Accident: वरसोली समुद्र किनारी पॅरासिलिंग करताना दोर तुटला; 2 महिला सुदैवाने बचावल्या

अलिबाग (Alibag) मध्ये नुकताच एका पॅरासिलिंग (Parasailing) अ‍ॅक्टिव्हिटी दरम्यान दोर तुटल्याने दोन महिला कोसळल्याची घटना समोर आली आहे.

Paragliding| Representative Image (Photo Credits: Pixabay)

डिसेंबर महिना म्हणजे अनेकांचा सुट्ट्या संपवायचे दिवस. अनेकजण सध्या राज्यात थंडीची थोडी चाहुल लागत असल्याने जवळच विकेंडला फिरायला जाण्याचे प्लॅन करत आहेत. आता महाराष्ट्रातही अनेक समुद्र किनारी वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पण अलिबाग (Alibag) मध्ये नुकताच एका पॅरासिलिंग (Parasailing) अ‍ॅक्टिव्हिटी दरम्यान दोर तुटल्याने दोन महिला कोसळल्याची घटना समोर आली आहे. दैव बलवत्तर म्हणून या दोघी महिला सुखरूप आहेत पण या घटनेमुळे आता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मागील आठवड्यात 27 नोव्हेंबरला साकीनाका मधील एक कुटुंब अलिबागला वर्सोली समुद्रकिनारी फिरायला गेले होते. या समुद्रकिनारी पॅरासिलिंगची सोय आहे. 2 महिलांनी पॅरासिलिंगचा आनंद घेण्याचं ठरवलं. मात्र अचानक दोर तुटला आणि त्या पाण्यात कोसळल्या. नशिबाने त्यांना दुखापत झालेली नाही. बोटीवर असणार्‍या दोन जीवरक्षकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती हा प्रसंग घडला तेव्हा समोरच हजर होते. त्यांनी घटनेचा व्हिडीओदेखील केला आहे. नक्की वाचा:  Paragliding Turns Fatal: पॅराग्लायडिंग करताना एका तरुणाचा उंचावरून पडून जागीच मृत्यू, पोलिसांनकडून तपास सुरू .

अपघाताचा व्हिडिओ

दरम्यान लाईफ जॅकेट असल्याने महिलांना इजा झालेली नाही. तसेच बोटीवर असलेल्या जीवरक्षकांनी सारा प्रकार पाहून तात्काळ त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढले. सध्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल देखील होत आहे. मीडीयाशी बोलताना पॅरासेलिंग व्‍यावसायिक संजय पाटील यांनी यापुढे पर्यटकांच्या सुरक्षेची अधिक काळजी घेतली जाईल असे सांगितले आहे.