Akola Zilla Parishad And Panchayat Samiti By-Election 2021: अकोला जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक, जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम आणि विद्यमान स्थिती
अकोला जिल्हा परिषद रिक्त 14 आणि अकोला पंचायत समिती रिक्त 28 जागांसाठी ही पोटनिवडणूक पार पडत आहे.
अकोला जिल्हा परिषद (Akola Zilla Parishad) आणि पंचायत समिती (Akola Panchayat Samiti) रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. अकोला जिल्हा परिषद रिक्त 14 आणि अकोला पंचायत समिती रिक्त 28 जागांसाठी ही पोटनिवडणूक पार पडत आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही इच्छुक उमेदाराचा अर्ज दाखल झाला नाही. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 5 जुलै पर्यंत आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत कोणकोणते उमेदवार अर्ज दाखल करतात याबाबत उत्सुकता आहे.
अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये (Akola Zilla Parishad, Panchayat Samiti By-Election 2021) आरक्षणाचा मुद्दा 3 वर्षांपूर्वी न्यायप्रविष्ठ झाला होता. याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत आरक्षणाची टक्केवारी 50% पेक्षा जास्त असल्याचा मुद्दा मांडला होता. दरम्यान, डिसेंबर 2018 मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यास शासनाने पुढील आदेश निघेपर्यंत मुदत वाढ दिली. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाधीन राहात 2020 मध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचा निकालही लागला. दरम्यान, न्यायालयाने 4 मार्च रोजी अंतिम निर्णय देत ओबीसी मागास प्रवर्गाचे आरक्षण 27% पेक्षा अधिक राहणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जागा रिक्त झाल्या.
निवडणुक कार्यक्रम
अकोला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी संयुक्त निवडणूक कार्यक्रम आहे. त्यानुसार 5 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येतील. लगेचच दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होऊन त्यावर निर्णय करुन वैध उमेदवार यादी जाहीर होईल. या अर्जांबाबत 09 जुलै या दिवशी न्यायाधीशांकडे अपील करता येईल. न्यायाधीश प्राप्त अपीलांवर निकाल देतील. त्याच दिवशी इच्छुकांना निवडणूक चिन्हही दिले जाईल. 14 जुलैच्या दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. 19 जुलै या दिवशी मतदान पार पडेल. 20 जून या दिवशी मतमोजणी होईल तर 23 जुलै रोजी विजयी सदस्यांची नावे जाहीर केली जातील.
दरम्यान, अकोला जिल्हा परिषदेसाठी- लाखपुरी, बपोरी, घुसर, कुरणखेड, कानशिवणी, दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु., अकोलखेड, कुटासा,अंदुरा, देगांव, दगडपारवा, शिर्ला सर्कल आदी ठिकाणी निवडणूक पार पडेल. तर अकोला पंचायत समितीसाठी- माना, कानडी, दहिहंडा, घुसर, पळसो, कुरणखेड, चिखलगाव, निमकर्दा, पारस भाग, हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी, प्रिंप्री खु., अकोलखेड, मुंडगाव, रौंदळा, लाखपूरी, ब्रम्ही खु., आदी ठिकाणी निवडणूक पार पडेल.